मुंबई
महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) बिघाडीला सुरुवात झाली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यात काडी टाकली आहे. आता ही आग कुठपर्यंत जाईल, याचा काही नेम नाही. महाविकास आघाडी टिकणे शक्य नाही हे स्पष्ट झाले असून त्याची सुरुवात आजपासून झाली. ज्याप्रकारे सरकारसाठी शेवटचे अधिवेशन आहे तसेच महाविकास आघाडीसाठी देखील एकत्र राहण्याचे शेवटचे अधिवेशन असल्याची टीका आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली.
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर आमदार संजय शिरसाट म्हणाले की, याचा अर्थ आमचे काही वैयक्तिक भांडणे नाही. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचा प्रत्यय आला असेल. राजकीय भांडण वेगणे आणि व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे प्रत्येकाशी असतात आणि ते कधी तुटू नयेत. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे तुमचे पोटभेद असावेत मनभेद नसावेत. मनभेद नसावेत त्याचे उदाहरण आज पाहायला मिळाले. महाराष्ट्राची संस्कृती जपायचे काम अशा नेत्यांनी केले पाहिजे. त्याचा चांगला संदेश समाजात जातो. यात काही गैर वाटत नाही, असे शिरसाट यांनी सांगितले.
संजय राऊत यांना नेमका कोणाचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून हवा हे आधी त्यांनी ठरवायला हवे. त्यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून हवे असतील तर हा प्रस्ताव काँग्रेस स्वीकारेल, असे वाटत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वज्रमुठ सभा झाल्या त्यात खुर्चीमधील बदल उद्धव ठाकरे यांना आवडत नव्हता. त्यामुळे एकवेळेला आघाडी तुटेल पण मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर येणार नाही, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
काँग्रेस नेत्यांकडून याविषयी कोणतेही भाष्य केले जाणार नाही. कारण आता राज्यात काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आले आहेत. त्यांना स्वतंत्र लढायची खुमखूमी आली आहे, त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये राहील की नाही याबाबत शंका असल्याचे आमदार संजय शिरसाट म्हणाले. महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक शरद पवारांच्या नेतृत्वात लढली होती उद्धव ठाकरे यांच्या नाही. त्यांनी शरद पवारांचा चेहरा वापरला होता. जयंत पाटील यांच्या मनात काहीतरी सुरु असल्याचे आमदार शिरसाट म्हणाले.