अहमदनगर
लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (Anti Corruption Department) नाशिक येथील पथकाने आज अहमदनगरमध्ये (Ahmednagar) मोठी कारवाई केली. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त (Ahmednagar Mahapalika Commissioner) डॉ. पंकज जावळे (Dr. Pankaj Jawale) यांचे दालन सील करण्यात आले आहे. नगरमधील नगररचना विभागाशी संबंधित तक्रार मिळाल्याने ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. यासंबंधी अधिक माहिती देण्यासही पथकातील अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. नगर आणि नाशिकमध्येही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आयुक्तांचे दालन सील केले. मनपाच्या नगर रचना विभागातील एकाला ताब्यातही घेतल्याचे सांगण्यात येते. महापालिकेत दोन दिवसांपासून गोपनीय पद्धतीने कारवाई सुरू असल्याचीही चर्चा होती. यात बडे अधिकारीच अडकल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली.
बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. याच प्रकरणात 19 आणि 20 जून रोजी ही लाच मागितली होती.
अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने नागरिकांनी वाजवले महानगरपालिकेसमोर फटाके वाजवले. अधिकाऱ्यांचा निषेध करत नागरिकांनी महानगरपालिकेसमोरच फटाके फोडले.