मुंबई
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) उद्यापासून सुरु होत आहे. या निमित्ताने राज्य सरकारकडून विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत आपण राज्य सरकारच्या चाहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर (MahaYuti) सडकून टीका केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली. खरंतर ही जुमलेबाजीच आहे. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जे हमीभाव मिळत होते तेच 2024 ला मिळत असतील, तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्कारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हमीभाव देण्याबाबत सांगतील, अशी आशा होती. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, खरंतर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर, बियाणांवर, ट्रॅक्टर आणि शेतीपयोगी अवजारांवर 18 टक्के जीएसटी लावतं, दुसरीकडे हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5 टक्के जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3 टक्के जीएसटी, सोने खरेदी करत असताना 2 टक्के जीएसटी, म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं सरकार आहे हे सिद्ध झालं आहे. जीएसटी कुठे लावावी हे या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचं भानसुद्धा नाही. अत्यंविधीच्या प्रत्येक सामानावर सरकारने 18 टक्के जीएसटी लावली आहे. त्यामुळे आता या सरकारने मरण ही महाग केलंय का? हा प्रश्न उपस्थित होतोय. युरियाची पिशवी 50 रुपयाला मिळायची. ती आता 150 रुपयांवर केलीय. तसेच 50 किलोची युरियाची पिशवी आता 40 किलोची केलीय. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त व्हावं, आत्महत्या करावं, हा चंगच या सरकारने बांधला आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.