पुणे
पुणे शहरातून कोकणात (Pune Konkan) जाणाऱ्या लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. वरंधा घाट (Varandh Ghat) आज 26 जून पासून बंद करण्यात आला आहे. भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरील सर्व वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यातील संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वरंध घाट 26 जून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत बंद राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश काढले आहेत. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट वाहतुकीकरता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी वरंध घाट हा शार्टकट मार्ग आहे. परंतु आता पर्यायी मार्ग वाहनधारकांना वापरावा लागणार आहे. वाहनधारकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे आणि पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर असा मार्ग वापरावा.