राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) २७ जूनपासून सुरू होत आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या एका विधानाने राजकीय विश्वात खळबळ उडवून दिली, येत्या दोन दिवसांत घोटाळ्याचा मोठा स्फोट होणार आहे. हा 5 हजार कोटींच्या कमिशनचा विषय आहे, असं ते म्हणाले.
रोहित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. नीट परीक्षेतील अनियमितता आणि राज्यातील ड्रग्ज प्रकरणावरून त्यांनी राज्यपालांना निवेदन दिले. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. रोहित पवारांनी राज्य सरकावर कमिशनखोरीचा आरोप करत म्हटलं की, दोन दिवस थांबा, फार मोठा स्फोट होणार आहे. हा 5000 कोटींहून अधिक कमिशनचा विषय आहे. फक्त दोन दिवस थांबा. मी याबद्दल संपूर्ण माहिती ट्विट करेन. जो खुलासा मी करणार आहे, त्यामध्ये विविध खाती आहेत, असं ते म्हणाले.
आता महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश प्रमाणे बुलडोजर पॅटर्न!
60 हजार कोटी रूपये अशी काम कंत्राटदारांना दिलेली आहेत. कंत्राटदारांना वेळेत पैसे मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाची 20 हजार कोटी रुपयांची बिले अद्यापही थकीत असून, बिले न भरल्याने राज्यातील बहुतांश कामे ठप्प आहेत, असंही ते म्हणाले. पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, उत्तराखंडसारखा पेपरफुटीचा कायदा राज्यात व्हावा यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत.
उत्तराखंडच्या राज्यपालांनी पुढाकार घेऊन उत्तराखंडमध्ये तसा कायदा केला. त्याच धर्तीवर राज्यपालांनी पुढाकार घ्यावा किंवा राज्य सरकारला तसा कायदा करण्याबाबत आदेश दिले पाहिजेत, असंही रोहित पवार म्हणाले. दरम्यान, राज्यात येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच आता रोहित पवारांनी दोन दिवसात मोठ्या घोटाळ्याचा मोठा स्फोट करणार असं वक्तव्य केल्यानं रोहित पवार नेमका काय स्फोट करणार हेच पाहणं महत्वाचं आहे.