काल दिवसभरापासून अयोध्येतील श्रीराम मंदीर (Ram Mandir) पुन्हा चर्चेत आलं आहे. लोकसभा निवडणुकीत येथे भारतीय (Lok Sabha Election) जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता त्यावेळीही देशभरात राम मंदीर (Ayodhya Ram Mandir) चर्चेत होतं. यावेळचं कारण मात्र वेगळं आहे. सोशल मीडियावर राम मंदिराच्या छतातून पाणी गळत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या बांधकामावरच लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र आता याची दुसरी बाजूही समोर आली आहे. मंदीर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी हा दावा स्पष्ट शब्दांत नाकारला आहे.
मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पाणी पडत आहे. मी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाचं पाणी पडताना पाहिलं आहे. या मजल्याचे निर्माण कार्य या महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होईल. मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे गर्भगृहाकडे जाणारी पाण्याची वाट बंद आहे. येथे जमा होणारे पाणी हाताने काढले जात आहे. पाणी येथे साचणे किंवा गळणे या प्रकाराचा मंदिराच्या डिझाईनशी तसा काहीच संबंध नाही. फ्लोअर उघडा असल्याने पाणी खाली पडतच असते, असे नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्ट केलं.
‘इंडिया’, ‘एनडीए’ पुन्हा भिडणार
अयोध्येत राम मंदिराची उभारणी होऊन सहा महिनेही झालेले नसताना मंदिरात पाणी साचलं. गर्भगृहातही पाणी साचल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीच दिली होती. मंदिराच्या बांधकामात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी अयोध्येत जोरदार पाऊस झाला होते. येथील रस्तेही पाण्याखाली गेले होते. अशा परिस्थितीत राम मंदिरातही पाणी साचल्याचे व्हिडिओ मोठ्या संख्येने व्हायरल झाले होते.
यावरून मंदिराचे बांधकाम आणि प्रशासनावर टीका केली जात होती. कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले परंतु, येथे पाणी साचते यावरून टीका केली जात होती. परंतु, यामागची दुसरी बाजू समोर आली आहे. मंदिरात पाणी येण्याचं खरं कारण काय आहे याचा खुलासा मंदीर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी करत या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.