मुंबई
उबाठाकडून पक्ष (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) चोरीला गेला, चिन्ह चोरीला गेले म्हणून आमचे मतदान शिवसेनेला मिळाले, असा आरोप म्हणजे पोरकटपणा आहे. घटनेने निर्माण केलेल्या निवडणूक आयोगाने (Election Commission) घटनेच्या अधीन राहून उबाठाला (UBT) पूर्णपणे शिवसेना प्रक्रियेतून बाहेर केले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे उबाठा गटच घटनाबाह्य आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (Shiv Sena) मुख्य सह प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीने उबाठाला नाकारले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिवसेनेच्या यशानंतर उबाठाचा आणि संजय राऊत यांचा रडण्याचा आणि आरोप करण्याचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे. हा स्ट्राईक रेट विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत असाच वाढत राहणार आहे, कारण जनता आमच्यासोबत आहे, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. उबाठाचा मराठी मतांचा जनाधार पूर्णपणे नाहीसा झाला आणि त्यांना केवळ ४% मते मिळाली. मुंबईत लोकसभा निवडणुकीत उबाठाच्या तुलनेत २ लाखांहून अधिक मते शिवसेनेला मिळाली, असे डॉ. राजू वाघमारे म्हणाले.
उबाठाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन आदर्श सोसायटीचे सभासद होण्याचा प्रयत्न केला हे सर्वच माध्यमांमध्ये प्रसारित झाले. शिक्षकांचे खच्चीकरण करणारे निर्णय ज. मो अभ्यंकर यांनी घेतले. यासंदर्भात ज. मो. अभ्यंकर यांनी पाठवलेल्या अब्रुनुकसानीच्या नोटीशीला भिक घालणार नाही, असे डॉ. राजू वाघमारे यांनी ठणकावून सांगितले. अर्बन नक्षलवादाबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेली नोटीस हा पोरखेळ आहे, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू लावतो, असे म्हटले होते कारण गुढी उभारायला पण बांबू लागतो,झेंडा लावायला पण बांबू लागतो व तिरडीला पण बांबू लागतो. मात्र उबाठाला कोणत्या बांबूची भिती वाटतेय, असा सवाल डॉ. राजू वाघमारे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, संजय राऊत या बोलक्या पोपटाला एक सांगायचे आहे, की जनतेनेच आता बांबू हातात घेतला आहे. विधानसभेत जनता तोच बांबू वेगळ्या पद्धतीने चालवून उबाठाला त्यांची जागा दाखवेल. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि उबाठा पालापाचोळ्याप्रमाणे निघून जातील, असा विश्वास डॉ. वाघमारे यांनी व्यक्त केला.