महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. (Mahayuti) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत पडद्यामागे जोरदार घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. महायुतीत विशेष म्हणजे भाजप पक्ष सर्वाधिक जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप राज्यात २८८ जागांपैकी १५५ जागा लढण्याच्या तयारीत आहेत. भाजपचा हा पवित्रा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य असेल का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण महाविकास आघाडी पेक्षा महायुतीत आतापासूनच जागावाटपासाठी खलबतं सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे भाजपला या निवडणुकीत मोठी झळ बसली. यानंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशा परिस्थितीत आता महायुतीमधील घटक पक्ष किती जागांवर निवडणुका लढतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जागावाटपाच्या चर्चेत यावेळी महायुतीनं आघाडी घेतलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत प्राथमिक चर्चेतनुसार भाजपनं सर्वाधिक जागांवर दावा केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५५ जागा लढवणार आहे. तर मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ६०-६५ जागांवर आपले उमेदवार देणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी ५० ते ५५ जागा सोडण्याचा विचार होतोय. तर महायुतीतल्या 3 मित्र पक्षांना १५ जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभेत नव्या-जुन्यांची मांदियाळी
या वृत्तावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलीय. “माझ्या माहितीप्रमाणे अजित पवारांच्या गटाची बैठक झालीय. जागा वाटप अजून कोणतही झालेलं नाही. महायुतीसोबत जाण्यास अजित पवार गटातील अर्ध्या लोकांनी नकार दिल्याची माझी माहितीय कपोलकल्पित बातम्या तुम्ही देवू नका”, अशी प्रतिक्रीया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिलीय.
Mahayuti मविआत बिघाडी?
दुसरीकडे स्ट्राईक रेटवरुन मविआतही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं जातंय. लोकसभेला कमी जागा लढलो महाआघाडी टिकावी म्हणून, विधानसभेत अधिकच्या जागांबाबत असं विधान करुन शरद पवारांनी सुतोवाच केलंय. त्यावर शरद पवारांचा स्ट्राईक रेट जास्त असला तरी सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही काम केलं नसल्याची तक्रार संजय राऊतांनी केलीय. तर तिकडे सांगलीच्या मिरजेत बोलताना यापुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असं विश्वजित कदमांनी म्हटलंय. मिरज विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा आहे. त्याठिकाणीच विश्वजित कदमांनी केलेलं काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन पुन्हा महाआघाडीत बिघाडीत सुरुवात असल्याचं बोललं जातंय.काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी ८० ते ९० जागांची मागणी केली होती. तर शिंदे गटाच्या रामदास कदम यांनी किमान १०० जागांचा आग्रह धरला होता. मात्र पहिल्या टप्प्यातल्या चर्चेनुसार शिंदे किंवा अजित पवार दोघांना ३ आकडी जागा लढवण्यास मिळतील याची शक्यता दिसलेली नाही. त्यामुळे यापुढच्या फेऱ्यांमध्ये कोण किती बार्गेनिंग करतं? यावर अंतिम आकडा ठरेल असं बोललं जातंय.