पुणे लोकसभा मतदारसंघातून भाारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी विजय मिळवला. भाजपातील (Pune News) कार्यकर्ता, पुण्याचे महापौर ते थेट केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. खासदार झाल्यानंतर मोहोळ यांना थेट केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली. यानंतर मुरलीधर मोहोळ स्व. गोपीनीथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यांनी गोपीनाथ मुंडेंबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यामुळेच मी घडलो असे मोहोळ म्हणाले.
मला केंद्रात मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा नव्हती. परंतु, ज्यावेळी मला याची जाणीव झाली की मला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे त्यावेळी मी खरंच हैराण झालो. शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी मला राष्ट्रीय अध्यक्षांच्या पीएचा फोन आला आणि शपथविधीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या. सुरुवातीला तर मला काहीच समजलं नाही. शेतकऱ्याचा मुलगा होतो. घरी उसाच्या गाडीवर काम करत होतो. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अशी संधी ही फक्त भाजपातच मिळू शकते असे मोहोळ म्हणाले.
मराठवाड्यातील पाणीटंचाई कधी संपणार?
पुण्यातील कोथरूड भागात काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे बंधू येथून सलग चार वेळेस नगरसेवक होते. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली आणि माझं नाव आलं. माझं गाव आणि आसपासच्या परिसरातील लोकं येथे राहायला आली. त्यांनी मला या निवडणुकीत विजयी केलं. त्यावेळचा आनंदही माझ्यासाठी खूप मोठा होता. यानंतर मी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी मुंडे साहेबांनी माझं कौतुक केलं होतं. तिथून पुढे माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली पुढे चार वेळेस मी नगरसेवक म्हणून निवडून आलो.
गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आठवण सांगताना मोहोळ भावूक झाले. गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते. त्यांचा सहवास आम्हाला मिळाला. त्यांच्याबरोबर एक पिढी घडली. गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. आज या आनंदाच्या क्षणी मला जर सर्वात जास्त कुणाची आठवण येत असेल मी सर्वाधिक कुणाला मिस करत असेल तर ते गोपीनाथ मुंडेंना. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्यामुळे आज जर ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.