नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर :- उल्हासनगर शहरात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे (Rain) उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाच्या कामाचा पर्दाफाश झाला आहे. एकीकडे शहरातील नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने न केल्याने शहर जलमय झाले आहे, तर दुसरीकडे शहरातील आपत्कालीन परीस्थिती हाताळणारी यंत्रणाच खड्ड्यात अडकल्याचे चित्र दिसून आले. मात्र काही वेळेनंतर क्रेनच्या मदतीने सदर गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.
उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरात एका ठिकाणी झाड पडले होते, याबाबतची माहिती उल्हासनगर अग्निशमक दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. मात्र तिकडून परत येत असतांनाच अग्निशमन दलाची गाडी रस्त्यातील खड्ड्यात अडकली. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे येथे मोठी दुर्घटना घडू शकली असती. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी नाल्यांची साफसफाई योग्य पद्धतीने झाली नसल्याने उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या कामाचा पर्दाफाश झाला.
उल्हासनगर शहरातील केबी रोड, खेमाणी, नाना-नानी पार्क, गोलमैदान, स्टेशन रोड आदी मोठ्या नाल्यांच्या आवारात पाणी तुंबून पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या खासगी ठेकेदाराला नालेसफाईचे काम मिळते, त्याच ठेकेदाराला शहरातील खड्डे बुजवण्याचे कंत्राटही मिळते. पाणी तुंबल्याने शहरातील खड्ड्यांमध्ये दुचाकी वाहने देखील पडताना दिसत आहेत. महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचारामुळे शहर पुन्हा एकदा बुडणार की खड्ड्यात पडणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.