बारामतीत सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला होता. यावरून आता शरद पवारांनी (Sharad Pawar)अजित पवारांवर जोरदार टीका केली. सुडाचं राजकारण आपण कधी केलं नाही, पण, गावातल्या नेत्यांचं दुकान बारामतीत काही चाललं नाही, अशी टीका पवारांनी केली. शरद पवार सध्या बारामतीच्या दौऱ्यावर असून एका शेतकरी मेळाव्यात बोलतांना पवार म्हणाले की, सांगवीला माझं जाणं येणं नेहमी असायचं. अनेक सहकारी होते काही हयात आहेत व काही नाहीत. सांगवीचे नेतृत्व आता नव्या पिढीच्या हातात आहे. अनेक निवडणुकींना सांगवीच्या नागरिकांनी सतत आम्हा लोकांना पाठिंबा दिला.
लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी बारामतीत काय होणार? याची चर्चा झाली. मी दिल्लीला गेलो तरीही बारामतीची चर्चा असायची. परदेशातही बारामतीची चर्चा झाली. लोकांना चिंता वाटायची. पण बारामतीकर जो निकाल द्यायचा तो, देतात. ज्यावेळी मतपेटी उघडली गेली तेव्हा बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांचा 40 ते 45 हजार मतांनी विजयी केलं. मी तुम्हाला खात्री देतो की देशाच्या लोकसभेत तुमच्या मतदारसंघाचं नाव गाजल्याशिवाय राहणार नाही, असं पवार म्हणाले.
नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा, निवडणूक आयोगाला कोणी केली मागणी ?
Sharad Pawar ….त्यांना ताकद देण्याचं काम करू – पवार
पुढं बोलतांना पवार म्हणाले, मी तुम्हाला खात्री देतो की कोणाचा किती विरोध झाला असला तरी तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही. मी सध्या अनेक गावांना भेटी देत आहे. गावातील लोक सांगतात निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध झाला. पण मी सांगतो, विरोध झाला तर विसरून जायचं. सुडाचं राजकारण आपप कधी करत नाही. पण एक गोष्ट आहे. बारामती तालुक्यातील जनतेने सिध्द केलं की नेते गावातले होते. पण त्यांचं दुकान चाललं नाही. सामान्य माणसांचं आणि साध्या माणसांचं दुकान जोरात चाललं. त्यामुळं नवी पिढी पुढे आली. त्यामाध्यमातून गावाचा विकास होईल. ही जबाबदारी आमची राहिल. ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली. त्यांना ताकद देण्याचं काम करू, असं सूचक विधान पवारांनी केलं.
ते म्हणाले, या निवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष होतं. आज माझ्याबरोबर रशियावरून पीटर नावाचा एक मुलगा आलाय. मी त्याला विचारलं कशासाठी येतोय? तो म्हणाला गावामध्ये तुमच्या निवडणुका झाल्या त्याची काय पध्दत असते? हे पाहायला आलोय. रशियात देखील बारामतीच्या निवडणुकीची चर्चा झाली. म्हणूनच तो स्वतः रशियाहून इथे आला आहे. काही हरकत नाही, जी चर्चा सगळीकडे झाली, तो इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला, असं पवार म्हणाले.