मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पाऊस परतल्याचे दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मंगळवारी रात्री पावसाच्या काही मुसळधार सरी कोसळल्या होत्या. त्यानंत रात्रभर अधुनमधून पावसाची रिपरिप सुरु आहे. मात्र, मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगर परिसरात बुधवारी पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आता हा पाऊस दिवसभर पडणार की काही तासांमध्ये पाऊस (Rain) पुन्हा गायब होणार, हे पाहावे लागेल. मात्र, पावसाची संततधार सुरु राहिल्यास प्रथेप्रमाणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो. यंदा मान्सून मुंबईत गेल्यावर्षीपेक्षा लवकर पोहोचला होता. मात्र, मुंबईवर वरुणराजाची सुरुवातीचा एक दिवस झालेला पाऊस वगळता कृपादृष्टी झालेली नाही. त्यामुळे मुंबईकर दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. कारण मुंबईतील उकाडा (Mumbai Temperature) अजूनही कायम आहेत. याशिवाय, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने जवळपास तळ गाठला आहे. परिणामी मुंबई महानगरपालिकेने (BMC) सध्या पाणीकपात लागू केली आहे.
Monsoon राज्यभरात पावसाची ओढ
राज्यात पावसाने आठवडाभरापासून ओढ दिल्याने तापमानात वाढ होऊन पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहेत. राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त 5.69 टक्के पेरण्या झाल्या असून, पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात पडले आहेत. मात्र, कृषी तज्ज्ञांकडून चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात अनेक भागात चांगला पाऊस झाला. खरीप पेरणीला वेग आल्याच चित्र आहे . मात्र, कृषी विभागाने पाऊस चांगला झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन केल्यानंतरही पेरणी करण्यासाठी शेतकरी मात्र घाई करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दादर माटुंगा परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरवात झाली असून आज दिवसभर मुंबईतील वातावरण ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे वरळी व तसेच दादर या सखल भागात पाणीदेखील साचल्याचे चित्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा नालेसफाई वरती प्रश्नचिन्ह सध्या उभे राहत आहे. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. रेल्वे सेवेवरही पावासमुळे परिणाम होण्याची शक्यता असून ती धास्तीही मुंबईकरांच्या मनात असतेच.त्यामुळे आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.