मुंबई
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविषयी भाष्य करताना पॉलिटिकल एजंट असा उल्लेख केला होता. राऊत यांच्या या विधानावरून भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या अध्यक्षाला दलाल बोलणे हे त्या संविधानिक पदाचा अपमान आहे. संजय राऊत यांच्यावर विधिमंडळात हक्कभंग आणून गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी दरेकरांनी केली आहे.
दरेकर म्हणाले की, संजय राऊत मातोश्रीचे, उद्धव ठाकरेंचे खाताहेत, सामनाचा पगार घेताहेत. सगळ्या सवलती घेताहेत आणि शरद पवारांची चाकरी करताहेत. म्हणजे मातोश्रीचे खाताहेत मीठ आणि शिवसेनेची, सगळ्यांची मारताहेत नीट हे त्यांच्या स्वतःसाठी लागू आहे. शिवसेनेची जी अधोगती होतेय त्याला सर्वस्वी संजय राऊत जबाबदार आहेत. राऊत यांना उद्धव ठाकरेंनी बाजूला केले तर शिवसेनेला उरलं सुरलं भविष्य राहील, नाहीतर पूर्णपणे संपुष्टात येईल.
दरेकर पुढे म्हणाले की, भाजपा हा आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणे आणि सर्व गोष्टींचे विश्लेषण करत आढावा घेत नव्या जोमाने नियोजनबद्ध कामाला लागणार पक्ष आहे. जिंकलो म्हणून हुरळून जात नाही. जिंकलो तरी आत्मचिंतन करतो आणि जरी अपयश आले तरी खचून न जाता त्यात्या मतदारसंघाचा अभ्यास करून पुढील येणाऱ्या सर्व गोष्टींना सामोरे जायचे या भावनेतून आम्ही निरीक्षक जात आहोत. त्यानिमित्ताने महायुतीतील समन्वय, कार्यकर्त्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी काय करावे लागेल, तेथील राजकीय परिस्थिती काय? आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यात्या विधानसभेत काय करण्याची गरज आहे यावर उपाययोजना करण्यासाठी निरीक्षकांचा दौरा फायद्याचा ठरणार आहे.
तसेच ज्यांनी संघटनेत किंवा महायुतीत चुकीचे काम केलेय ते वरिष्ठाच्या निदर्शनास आणण्याचे काम यानिमित्ताने होईल. म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय, जर एखाद्याने पक्षविरोधी, महायुती विरोधात कार्यवाही केली असेल तर त्याची दखल घेऊन कारवाईची आवश्यकता आहे. नाहीतर काही केले तरी चालते हा विश्वास काही लोकांच्या मनात निर्माण झाला तर ते महायुती आणि पक्षासाठी योग्य ठरणार नाही. पेरावे तेच उगवत असते. जयंत पाटील यांनी जे पेरले ते उगवणार आहे. सांगलीचा एक निकाल केवळ सांगलीचे राजकारण बदलवणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या राजकारणाला टर्निंग पॉईंट देणारे ठरेल.
कोकणातील बॅनर वॉरवर बोलताना दरेकर म्हणाले की, नारायण राणे यांच्या कोकणच्या नेतृत्वावर कुणी शंका घेण्याचे कारण नाही. त्यांनी निर्विवादपणे कोकणचे नेतृत्व केलेय. एखादे यश, अपयश आले असेल. परंतु कोकणच्या विकासातील एक महत्वाचा नेता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा निश्चितच आहे. म्हणून बाप तो बाप असतो, नेता तो नेता असतो, अशा प्रकारचे नाचे असतात त्यांनी वक्तव्य करणे हे राणेंसमोर तोटक आहे. राणे राणे आहेत. भाजपाचा नेता म्हणून कोकणला ते आणखी घट्ट करतील. पिलावळानी जास्त गडबड करण्याची गरज नसल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला.
अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले की, मतं मिळाल्यानंतर कृतघ्नपणा काय असतो ते अंबादास दानवे यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात त्यांना जे यश मिळाले ते कुणाच्या जीवावर मिळालेय. सोयीचे तिथे फायदा जिथे मिळाले नाही तिथे टीका करायची अशी दानवेंची संधीसाधू भुमिका आहे. आमच्याकडून संविधानाबाबत ज्या चुका झाल्यात त्या दुरुस्त करून आम्ही नम्रपणे दलित समाजासमोरही जातोय तो समाज निश्चितच महायुतीला आपलासा करेल याची त्यांना भिती वाटतेय त्यातूनच दानवेंचे आलेले हे वक्तव्य आहे.
विरोधकांनी केलेल्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले की, दंगल करण्याची कुणाची इच्छाही नाही. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या काळात कुठेही आपल्याला दंगल झालेली दिसणार नाही. परंतु राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी काही धर्मियांच्या मतांवर विश्वास आलाय आणि ती मतं टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा आहे. मविआची काल प्रेस झाली त्याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित नव्हते. याचा अर्थ मोठा भाऊ, छोटा भाऊवरुन त्यांचा विसंवाद किती टोकाला गेलाय हे दिसतेय. आम्ही महायुतीतील सर्व पक्ष एकत्रितपणे, ताकदीने निवडणुकांना सामोरे जाऊ आणि या महाराष्ट्रावर छत्रपतींचा भगवा झेंडा महायुती फडकवेलच, असा विश्वास आहे.