रमेश तांबे, ओतूर
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका मानव बिबट संघर्ष यावर उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत समितीची बैठक शनिवार दि.१५ रोजी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे यांच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जुन्नर तालुक्यातील बिबट हल्ल्यांच्या (Leopard Attack) पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत बिबटे पकडण्यासाठी पिंजाऱ्यांची संख्या वाढविण्या संदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी येत्या एक ते दीड महिन्यात पूर्ण होईल असे पुणे प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रविण यांनी सांगीतले. यावेळी ते म्हणाले सध्या दिडशे पिंजरे उपलब्ध आहेत हि संख्या आता तीनशे पिंजरे इतकी होणार आहे हे पिंजरे बनवण्याचे काम देखील सध्या सुरू आहे.
बिबटे पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्स साठी नगदवाडी आणि पिंपरखेड येथे बेस कॅम्प तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये गेल्या १५ दिवसांत दिसेल तिथे बिबट्या पकडण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत देण्यात आल्यानंतर आत्ता पर्यंत २५ ते २६ बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. यातील १० बिबटे गुजरात मधील जामनगर याठिकाणी पाठविण्यात येणार आहेत आणि राहिलेले बिबटे इतर ठिकाणी पाठवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सध्या चर्चा सुरू आहे. तसेच माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण करून या केंद्रातील बिबट्यांची संख्या वाढवून ती ११० इतकी करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
तसेच नसबंदी संदर्भातील प्रस्तावातील त्रुटींवर काम करून तो प्रस्ताव पुन्हा ( पिसीसीएफ ) कडे पाठवण्यात आलेला आहे. लवकरच हा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागासाठी नवीन सात वाहने देण्यात येणार असल्याचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी माहिती देताना सांगितले. त्याचप्रमाणे बेस कॅम्प साठी नेट, काठ्या, टॉर्च बॅटरी, ट्रँकुलायझिंग गन, ड्रोन कॅमेरे यासारखे आवश्यक साहित्य पुरविण्यात येणार आहे. तसेच धनगरांच्या वाड्यांसाठी तंबू, टॉर्च बॅटरी पुरविण्यात येणार आहे.सध्या प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असताना गेल्या १५ दिवसांत दिसेल तिथे बिबट्या जेरबंद करण्याचे आदेश दिल्यानंतर वन विभागाने चांगले काम केले आहे. जुन्नर तालुक्यातील जनतेने सतर्क राहावे बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मानव बिबट संघर्ष यावर उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत समितीचे सदस्य आमदार अतुल बेनके,आमदार ॲड.अशोक पवार, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे एन.आर.प्रविण साहेब,जुन्नरचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, दक्षता विभागीय वनअधिकारी राम धोत्रे,जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण,ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.