मुंबई
नागपूरजवळील धामणा येथील स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत (Nagpur Chamunda Company Blast) झालेल्या दुर्घटनास्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भेट दिली आहे. घटनास्थळाची पाहणी करून स्फोटाचे नेमके कारणे काय, यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळतेय. याघटनेवरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
नागपूर धामणा येथील घटनेमध्ये मृतकांच्या कुटुंबीयांना तात्काळ 25 लाख रुपयांचा चेक मालकाकडून मिळावा. त्याशिवाय मृतदेह उचलले जाणार नाही असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. या कंपन्यांमध्ये दर महिन्याला विझिट करून सुरक्षेची व्यवस्था केली जाते की नाही याची पाहणी करणे गरजेचे होतं. मात्र, याकडे संबंधित विभागाने साफ दुर्लक्ष केलेलं आहे.
कुठलाही प्रशिक्षण न देता मजुरांकडून काम केलं जात होतं, तेही अवघ्या मोजक्या दरात. या सगळ्या प्रकरणाची गंभिरपणे चौकशी केली पाहिजे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यात मंत्र्यांचे नातेवाईक नागपुरात हप्ता वसुली करतात असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
नागपुरातील चामुंडा एक्सप्लोसिव्ह ब्लास्ट प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आता कंपनीचे मालक शिव शंकर खेमका यांना ताब्यात घेतलं आहे. संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मनुष्यवध, मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.