मुंबई
राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले, तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पावसाचे प्रमाण झाले नसल्याने राज्यातील 1245 महसुली दुष्काळ सदृष्य (Drought) महसुली मंडळात चारा डेपो (Chara Depo) उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचे पालन करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. असे असले तरी पावसाचे प्रमाण अद्यापही समाधानकारक नसल्याने अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. सध्या राज्यात 512.58 लाख मॅट्रिक टन हिरवा चारा तर 144.55 लाख मॅट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जून पुरेल असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला आहे. चाऱ्याचे प्रमाण कमी होत असताना शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना जनावरांचे पालन पोषण करताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 31 ऑगस्ट पर्यंत तथा पावसाचे प्रमाण समाधानकारक होईपर्यंत दुष्काळ सदृष्य भागात चारा डेपो उभारून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता देऊन शासन निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चारा डेपो संदर्भात शासनाने शासन निर्णय जाहीर करत चारा डेपो उभारण्यास परवानगी दिली आहे. यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.