10.6 C
New York

Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळातले अनोळखी चेहरे सर्वात श्रीमंत

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारच्या कामकाजाला (Modi Cabinet) सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भाजप आणि एनडीएतील घटक पक्षांच्या खासदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. यंदा भाजपला बहुमत मिळालेले नाही त्यामुळे जेडीयू, टीडीपी, शिवसेना यासारख्या पक्षांनाही मंत्रिपदे द्यावी लागली आहेत. मोदी यांच्या बरोबर जवळपास 71 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यातील काही नावं अशी आहेत ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Modi Cabinet महाराष्ट्रातले पाटील, गुजरातचे नेते आता थेट मंत्री

गुजरातमधील नवसारी मतदारसंघातून तब्बल 7.77 लाख मतांनी विजयी झालेले सी आर पाटील आता मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. पाटील गुजरात भाजपचे अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे पाटील यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव मध्ये झाला आहे. पण त्यांनी गुजरातच्या राजकारणात आपला पक्का जम बसवला आहे. पाटील यांनी सन 2009 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर 2014, 2019 आणि 2024 मध्ये याच मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. पाटील पीएम मोदी यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनी पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी सुद्धा केली होती. 1984 मध्ये नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय सुरू केला. याच दरम्यान ते समाजसेवा देखील करत होते. पुढे 1989 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. दक्षिण गुजरातेत भाजपला मजबूत करण्याचं श्रेय सी आर पाटील यांनाच जातं.

Modi Cabinet शिक्षक ते केंद्रीय मंत्री : निमुबेन बंभानिया

गुजरातमधील भावनगर मतदारसंघात 4.55 लाख मतांनी विजयी होत निमुबेन बंभानिया संसदेत पोहोचल्या आहेत. यानंतर त्यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली आहे. निमुबेन या शिक्षक आहेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. निमुबेन आणि त्यांचे पती दोघे मिळून शाळा चालवतात. निमुबेन यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सरकारी वाहनांच्या वापराविरोधात निर्णय घेतला होता. इतकेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या कार्यालयात येण्याचीही परवानगी नव्हती. निमुबेन 2009 ते 2010 आणि 2015 ते 2018 या काळात भावनगरच्या महापौर होत्या.

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर ‘हा’ नेता जाणार

Modi Cabinet भारतरत्न कर्पुरी ठाकूरांचे पुत्र केंद्रात मंत्री

राज्यसभेचे खासदार रामनाथ ठाकूर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. बिहारच्या राजकारणात ठाकूर नाव चांगलच ओळखीचं आहे त्यातही ठाकूर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय आहेत. रामनाथ ठाकूर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. रामनाथ ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. कर्पूरी ठाकूर जोपर्यंत राजकारणात होते तोपर्यंत त्यांनी आपल्या मुलाला राजकारणापासून लांब ठेवले होते. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार सतीश चंद्र दुबे यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. सतीश दुबे उत्तर बिहारमधील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. सन 2014 ते 2019 पर्यंत वाल्मिकी नगर मतदारसंघातून सतीश दुबे लोकसभेचे खासदार राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांचे तिकीट कट करून भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. खासदार होण्याआधी सतीश दुबे चनपटिया आणि नरकटिया विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.

Modi Cabinet एनडीएचा व्हीआयपी झटका, राजभूषण चौधरींना मंत्रिपदाची लॉटरी

मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे मुजफ्फरपूर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेले डॉ. राजभूषण चौधरी निषाद. काही महिन्यांपूर्वी त्यांनी व्हीआयपी पार्टीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. आता त्यांना मंत्रिमंडळात जागा मिळणे म्हणजे विकासशिल इंसान पार्टीचे (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांच्यासाठी झटका मानला जात आहे.

Modi Cabinet भाजपचं केरळात खातं उघडणारा खासदार मंत्री

मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते सुरेश गोपी यांनी केरळमध्ये भाजपचे खाते उघडले आहे. त्यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले आहे. सुरेश गोपी यांची केरळमध्ये मोठी लोकप्रियता आहे. याच कारणामुळे भाजपने त्यांना तिकीट दिले होते. ज्या केरळमध्ये वर्षानुवर्षे भाजपला खाते उघडता आले नव्हते ते काम सुरेश गोपी यांनी करून दिले आहे. सन 1965 मध्ये सुरेश गोपी यांनी बाल कलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती.

Modi Cabinet सर्वात तरुण मंत्री : किंजरापू नायडू

तेलुगू देसम पक्षाचे खासदार किंजरापू राम मोहन नायडू सर्वात कमी वयाचे मंत्री आहेत. 36 वर्षीय नायडू आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. किंजरापू नायडू टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. राम मोहन नायडू यांचे वडील येरन नायडू तेलुगू देसम पक्षातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जात होते. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर राम मोहन नायडू यांनी राजकारणात प्रवेश केला.

Modi Cabinet सर्वात श्रीमंत मंत्री : चंद्रशेखर पम्मसानी

आंध्र प्रदेशातील गुंटूर मतदारसंघातून तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झालेले टीडीपी खासदार चंद्रशेखर पम्मसानी मोदी 3.0 टीमचे सदस्य बनले आहेत. पम्मसानी यांच्याकडे तब्बल 5 हजार 705 कोटींची संपत्ती आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ते सर्वात श्रीमंत उमेदवार होते. 1999 मध्ये चंद्रशेखर यांनी एमबीबीएस केले. यानंतर 2005 मध्ये अमेरिकेतील एका विद्यापीठातून एमडी पदवी घेतली. कर्नाटकातील मांड्या लोकसभा मतदारसंघातून 2.84 लाख मतांनी विजयी झालेले जेडीएसचे खासदार एचडी कुमारस्वामी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एचडी कुमारस्वामी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आहेत आणि कर्नाटकचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. कुमारस्वामी फिल्म निर्माता आणि व्यावसायिक देखील आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img