ठाणे
ठाणे शहरातील कळवा येथे (Kalwa Slab Collapse) त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे छत कोसळल्याने एक वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. ही इमारत धोकादायक असल्यानं स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आरडीएमसीच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांनी इमारतीच्या 30 फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सुमारे 100 रहिवाशांना बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, कळव्यातील भुसार अली भागात असलेल्या ओम कृष्ण सहकारी गृहनिर्माण संस्थेत बुधवारी रात्री 11.55 च्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे छत कोसळले. या घटनेत वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा जखमी झाला. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विभागीय प्रमुख यासिन तडवी यांनी दिली.
ही इमारत सुमारे 35 वर्षे जुनी आहे आणि धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर इमारतीतील 30 प्लॅटमध्ये राहणाऱ्या सुमारे 100 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. मनोहर दांडेकर, त्यांची पत्नी मनीषा आणि मुलगा मयूर अशी जखमींची नावे आहेत. या घटनेनंतर इमारत सील करण्यात आली. या इमारतीबाबत पुढील कारवाईचा निर्णय पालिका अधिकारी घेतील, असेही तडवी यांनी सांगितले आहे.