पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार (Ajit Pawar) गटाच्या फायर ब्रँड नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ( Uddhav Thackeray Group) येण्याचे आमंत्रण सोशल मीडियावर ट्विट करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिले आहे. अंधारे यांनी केलेल्या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटात येण्याचं निमंत्रणच दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांना उद्देशून एक ट्विट केलं असून सुषमा अंधारे यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांना अजून किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार? असा सवाल केला आहे. तर रूपाली पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत उपेक्षित ठेवलं जातंय, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटले. तर निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही सुषमा अंधारे यांनी म्हटले असून रूपाली रूपाली ठोंबरे पाटील यांना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटात येण्याचं निमंत्रणच दिल्याचं पाहायला मिळत आहे.
सुषमा अंधारे यांच्या या ट्विटनंतर अजित पवार गटात रुपाली पाटील यांची मुस्कटदाबी होत आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. सुषमा अंधारेंच्या या पोस्टमुळे आता रूपाली पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तर ठाकरे गटाचे दरवाजे रूपाली पाटलांसाठी खुले असल्याचे दिसत आहे. आता यावर रूपाली पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सुषमा अंधारे यांचे ट्विट काय?
निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता.. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…