मुंबई
लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निवडून आणण्याकरिता मनसेने राज्यातील महायुतीला (Mahayuti) बिनशेर्त पाठिंबा दिला होता. मात्र राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर आता मनसेने (MNS) विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) तयारी सुरू केली. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेची पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी 288 जागेचा आढावा घेतला आहे. तसेच विधानसभेत 250 जागेवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.
राज ठाकरे म्हटले की, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे. त्यामुळे आता जनता मनसेची वाट पाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण विधानसभेला 200 ते 250 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहोत असे राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले. राज ठाकरे यांचे हे वक्तव्य पाहता मनसे पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघांमध्ये आमच्या टीम जाणार आहेत आणि आढावा घेतला जाणार आहे. एक महिन्याने संपूर्ण राज्यातला मतदारसंघ आणि आढावा घेतल्यानंतर पुन्हा बैठक होणार आहे. पक्ष सरचिटणीस आणि नेते पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघनिहाय माहिती मागवतील ती लवकरात लवकर द्यावी पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न कराने अशी सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच युती आघाडी याबाबत लक्ष देऊ नका, असेही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.