21 C
New York

Malshej Ghat Landslide : माळशेज घाटात कोसळली दरड, दोघांचा मृत्यू

Published:

रमेश तांबे, ओतूर

मुंबईहून अहमदनगर- कल्याण महामार्गाने (Kalyan Ahmednagar Highway) जाणाऱ्या प्रवासी रिक्षावर, माळशेज घाटात दरड कोसळल्याने (Malshej Ghat Landslide) दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवार दि.12 रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती टोकावडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनकर चकोर (Dinkar Chakor) यांनी दिली.

सोयम सचिन भालेराव वय 7 वर्ष व राहुल बबन भालेराव वय 30, दोघेही रा.चंदनापुरी ता.संगमनेर जि.अहमदनगर अशी मृतांची नावे असून,या अपघातात विमल बबन भालेराव वय 55 वर्ष,बबन गोपाळ भालेराव वय 59 वर्ष,सचिन बबन भालेराव वय 40 वर्ष सर्व रा.चंदनापुरी ता.संगमनेर, जि.अहमदनगर हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत टोकावडे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पांडूरंग बगाड हे अधिक माहिती देताना म्हणाले की, मंगळवार दि.12 रोजी भालेराव कुटुंब मुलुंड (मुंबई) येथून नगर- कल्याण महामार्गावरून रिक्षाने त्यांच्या मुळगावी चंदनापुरी, ता.संगमनेर, जि.अहमदनगर येथे जात असताना सायंकाळी सव्वापाच  वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात त्यांच्या रिक्षावर दरड कोसळली. या रिक्षातून प्रवास करणारे सोयम भालेराव,राहुल भालेराव तसेच विमल भालेराव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी ओतूर 

जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत आणण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीहरी सारोक्ते व डॉ.डुंबरे यांनी त्यांची तपासणी केली असता, सोयम भालेराव व राहूल भालेराव या दोघांचा मृत्यु झाल्याचे त्यांनी घोषित केले.तसेच विमल भालेराव याही या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून,त्यांचा डावा हात फॅक्चर झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माळशेज घाट हा ठाणे जिल्ह्यात येत असून, दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर घाटात दरडी कोसळण्याच्या घटना गेल्या अनेक वर्षापासून वारंवार घडत आहेत, पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुके असल्याने, वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून, वाहन चालवावे लागते.माळशेज घाटात दरडी कोसळून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरडी कोसळल्याने दरडीखाली अनेक वाहने गाडली गेलेली आहेत.यासाठी लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग,राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कायमस्वरूपी ठोस उपाय योजना राबवाव्यात अशी मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img