छत्रपती संभाजीनगर
अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाने मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. छत्रपती संभाजी नगर सकल मराठा समाजाने (Sakal Maratha Samaj) विभागीय आयुक्तना निवेदन देत मराठा समाजाच्या आरक्षणा (Maratha Reservation) संदर्भात निर्णय घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.
जरांगे पाटील यांच्या सगे-सोयरे याबाबत तातडीने अध्यादेश काढण्यात यावा. मराठा आरक्षणाच्या मागणीतील अडथळे सरकारने दूर करावे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले होते. ते न पाळल्यास सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे व सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावे. यासाठी गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील अन्न पाणी त्याग करुन आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. काल चौथ्या दिवशी त्यांची शुगरची पातळी खाली आली आहे. रात्री परिस्थिती नाजुक झाली होती. सरकार गांभीर्यपूर्वक उपोषणाकडे लक्ष देत नसल्यामुळे जरांगे पाटील औषधोपचार सुद्धा घेत नाही आहे. त्यांच्या तब्येतीस संपूर्ण महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. शासनाने त्वरित दखल घेऊन सर्व मागण्या त्वरीत मान्य करून जी. आर. काढावा. सरकारने या अगोदर अनेक वेळा वेळ घेऊन, लेखी व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर शब्द दिला आहे. तो त्वरीत पुर्ण करावा अन्यथा महाराष्ट्रात पुन्हा लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडले जाईल याची सरकारने त्वरीत दखल घ्यावी असे निवेदन विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
विभागीय आयुक्तना निवेदन देता वेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, सुनील काटेकर, आत्माराम शिंदे, अशोक मोरे, गणेश गोळेकर, रेखाताई वहाटुळे, सुकन्या भोसले, संदीप जाधव, संजय मिसाळ यांच्यासह सकल मराठा समाजाचे नेत्यांचे सह्या आहे. यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.