मुंबई
हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असे विधान काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना उद्देशून केले होते. त्यांच्या या विधानाला भाजपा (BJP) विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज चोख प्रत्युत्तर देत टिकास्त्र डागले आहे. संयमाने वागावे असे सांगणारे पवार हे आता सोडणार नाही, बघून घेतो बोलताहेत यात थोड्याशा यशाचा मिळालेला अहंकार दिसून येतोय, असे दरेकरांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, शरद पवार आत्म्याचे अस्तित्व मानायला तयार झाले हे एक बरे आहे. कारण शरद पवार स्वतः देव मानत नाहीत. स्वतः नास्तिक आहेत असे ते म्हणालेत. त्यामुळे आत्म्याची संकल्पना जी आहे ते मान्य करताहेत हेही थोडके नाही. पवारांना ज्या ८ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे त्यांना हत्तीचे बळ आलेय की ते सगळ्यांना सोडणार नाहीत म्हणताहेत. काळ हा प्रत्येक गोष्टीचे उत्तर देत असतो. राजकारणात चढउतार येत असतात. संयमाने वागावे असे सांगणारे पवार हे आता सोडणार नाही, बघून घेतो बोलताहेत यात थोड्याशा यशाचा मिळालेला अहंकार दिसून येतोय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर दरेकर म्हणाले की, अजितदादा कधी काय बोलतील याचा कुणालाच थांगपत्ता लागू शकत नाही. ते अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. राजकीय गोळाबेरीज करत बसत नाहीत. जे त्यांना वाटते ते पटकन बोलून मोकळे होतात. तशाच अर्थाने भावनिक होत मागचा इतिहास आठवत कदाचित ते भावुक झाले असतील.
जरांगे पाटील यांच्या उपोषणावर बोलताना दरेकर म्हणाले की, जरांडगे यांच्या प्रकृतीची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. ते जे आरोप करताहेत त्यात अजिबात तथ्य नाही. या देशातील कुठल्याही नागरिकाचा, आंदोलकाचा घातपात करता येत नसतो. जरांगे यांनी एका व्यक्तीला, पक्षाला टार्गेट करून आपल्या आंदोलनाला दिशा देऊ नये.सरकार या प्रकरणी लक्ष घालून आहे. याआधी कुणबी नोंदीसंदर्भात एक धाडसी निर्णय मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांनी घेतला. १० टक्क्याचे आरक्षणही मराठा समाजाला दिले. मराठा समाजाला शंभर टक्के न्याय दिला जाईल.
जरांगे यांचा जीव आमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. त्यांनी काळजी घ्यावी, असेही दरेकर म्हणाले. तसेच जरांगेंच्या प्रत्येक गोष्टीशी सरकार सकारात्मक आहे. चर्चा करतेय. घातपात करायचा विषय असू शकत नाही. संपूर्ण मराठा समाज, महाराष्ट्र असेल जरांगे यांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता आहे. त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी सरकार, आरोग्य विभाग काळजी घेत असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
संजय राऊत यांच्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, स्वतः सुपारीबाज असल्यामुळे दृष्टी तशी सृष्टी दिसते. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडून शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली होती. त्यातलं अर्धे काम त्यांनी केलेय. उर्वरित राहिलेले काम सुपारी पूर्ण करायची भुमिका ते बजावत आहेत. शिवसेना संपुष्टात आणण्याचे काम सुपारीबाज राऊत करताहेत, अशी टीकाही केली.
ठाकरे महिन्याभरातून एकदा ऍक्टिव्ह होतात
उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह नसतात म्हणून ऍक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळतात. आम्ही तर रोज ऍक्टिव्ह असतो. आमचे कौतुक कधीच नसते. महिन्याभरातून एकदा जो ऍक्टिव्ह होतो त्याची तुम्ही बातमी करता. हेच वैशिष्ट्य उद्धव ठाकरेंच्या कामाचे असल्याची टिकाही दरेकरांनी केली.