मुंबई
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) मध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. ठाण्यातून निवडून आल्यानंतर नरेश म्हस्के यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी नरेश म्हस्के यांना दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सक्रीय उतरले होते. त्याशिवाय राज ठाकरे यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी काही सभा घेतल्या होत्या. त्यात निकालानंतर ठाण्यात 2 लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी दिल्लीत गेलात म्हणून मराठी माणसाला विसरू नका अशी सूचना म्हस्केंना केली आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, विद्यार्थी दशेपासून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आदर्श समोर ठेवत मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली विद्यार्थी सेनेचे काम करत असताना साहेबच आमचे बॉस होते. या निवडणुकीत मला उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी ठाण्यात सभा ही घेतली त्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. साहेबांचे भाषण हे संपूर्ण देशाचं आकर्षण बिंदू असतं. त्या सभेने आम्हाला जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास दिला. सभा संपल्यावर पाठीवर हात ठेवत त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्याचं फलित आज समोर आहे असं नरेश म्हस्के म्हटलं.