नवी दिल्ली
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची संध्याकाळी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी समारंभ होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) एनडीएला (NDA) 293 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आज मोदी पंतप्रधान (Modi Cabinet) पदाची शपथ घेणार आहे. हा शपथविधी सोहळा सायंकाळी होणार आहे. मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश असणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहे. मात्र एनडीएचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (Ajit Pawar) या मंत्रिमंडळात स्थान नसणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एनडीएचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दोन मंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी अजित पवार यांनी केली होत. आज मंत्रिमंडळात शपथविधी सोहळ्याला राज्यातील 6 खासदारांना पीएम कार्यालयातून शपथविधी करिता फोन आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अजित पवार गटाला या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते आणि मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यावेळी यावर चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादीला मंत्रीपद देण्यात येणार नसल्याने त्यांची समजूत काढण्याकरिता भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थाने जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली.
भाजप आणि एनडीएतील मित्र पक्षांचे खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकूण 36 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही भाजपच्या चार मंत्र्यांच्या नावाच समावेश असून शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा आहे. तर अजितदादा गटाला फक्त एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे. या मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आज सकाळपासून अनेक नेत्यांना फोन आले असले तरी प्रफुल पटेल यांना मात्र अद्याप फोन आलेल नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मोदी 3.0 मंत्रिमंडळात समावेशासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन केले जात आहेत. सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे. रामदास आठवले यांनाही फोन आला आहे. या सर्वांना पीएमओ मधून फोन आले असले तरी अजित पवार गटाचे चर्चेत असलेले नेत प्रफुल पटेल यांना अद्याप कोणताही फोन आलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कमोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार, सुनील तटकरे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पटेल हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात होतं.
प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी नागरी आणि उड्डाण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे पक्षाच्या वाट्याला येणारं कॅबिनेट मंत्रीपद नवख्या व्यक्तीकडे देण्याऐवजी अनुभवी व्यक्तीकडे देण्याचा बैठकीचा कल होता. त्यामुळेच पटेल यांना मंत्री करण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं गेलं. पटेल यांना नागरी उड्डाण मंत्रीपद मिळू शकतं अशी चर्चा होती, पण त्याला कुणीही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
राज्यात महायुतीचे सरकार आहे. यामध्ये अजित पवार गट देखील सरकारमध्ये समावेश आहे. मात्र केंद्रात अजित पवार गटाला कुठलेही मंत्रीपद देण्यात आलं नसल्याने याचा परिणाम राज्यातील राजकारणात होण्याची देखील शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.