पुणे शहरात मुसळधार (Pune Rain) पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शहरात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला होता. अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली. शिवाजी नगर, जेएम रोड, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजे येथे मुसळधार पाऊस पडत आहे.
गेल्या दीड तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील आपटे रोड परिसरात पाणी साचले आहे. आपटे रोड परिसरातील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. वाहनचालकांना पाण्यातून मार्गक्रमण करताना त्रास होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने केलेल्या नाले सफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुण्यातील येरवडा परिसरात पाणीच पाणी झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. घरातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. घरात पाणी शिरल्याने सामानाचे नुकसान झाले आहे. तासाभरात आलेल्या पावसामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल झाले आहेत. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तो अद्याप मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पोहोचलेला नाही. येत्या पाच दिवसांत महाराष्ट्राच्या या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उष्णतेपासून नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मान्सूनपूर्वी पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा पुणेकरांनी आनंद लुटला.