मुंबई
पावसाळ्यात कुठल्याही ठिकाणी दिसणाऱया खड्डय़ाचा (Bad Patches) फोटो पालिकेला पाठवल्यास 24 तासांत हा खड्डा बुजवण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने सर्व 25 वॉर्डसाठी संबंधित अधिकाऱयांच्या नावांसह व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे तक्रार आल्यानंतर निर्धारित वेळात खड्डा बुजवण्याचे काम पूर्ण झाले नाही तर संबंधित रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असणाऱया कंत्राटदाराला दंड करण्यात येणार असून ही रक्कम त्याला देय असणाऱया रकमेतून कापली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका (BMC) आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी दिली.
सततच्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे निर्माण होतात किंवा दुरूस्तीयोग्य रस्त्याची डागडुजी करावी लागते. पावसाळ्या दरम्यान रस्त्यांवर खड्डे आढळल्यास ते बुजविण्याची कार्यवाही लवकरात – लवकर करता यावी, या दृष्टीने नागरिकांना देखील सहज – सुलभ पद्धतीने खड्डे विषयक तक्रार नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. खड्डे व दुरूस्तीयोग्य रस्त्यांबाबत पारंपरिक पद्धतीने लेखी तक्रार करण्यासह तंत्रज्ञानाचा वापर करुन तक्रार नोंदवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अंतर्गत प्रामुख्याने दूरध्वनी, व्हॉटस्ॲप, मोबाईल ॲपसह समाजमाध्यमांद्वारे तक्रार करणे नागरिकांना सहज शक्य होणार आहे. या विविध पर्यांयाचा वापर करुन तक्रार केल्यानंतर साधारणपणे 24 तासांच्या आत संबंधित अभियंत्यांनी व कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी यापूर्वीच दिले आहेत. तसेच रस्त्यांची सुरू असलेली कामे ही दिनांक १० जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासह वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या सर्व कार्यवाहीचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. बांगर हे सातत्याने आढावा घेत आहेत. नागरिक, लोकप्रतिनिधी, समाजमाध्यमे याद्वारे सादर होणाऱया तक्रारी विविध व्यासपीठाद्वारे कशा सादर होतात, त्यांचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. बांगर यांनी आज (दिनांक ७ जून २०२४) आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असणा-या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती महानगरपालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येते. तर याच धर्तीवर रस्त्यांलगत असणा-या पदपथांची निर्मिती व देखभाल दुरुस्ती देखील महानगरपालिकेद्वारे करण्यात येते. तथापि, मुंबईतील काही रस्ते हे महानगरपालिकेच्या अखत्यारित नसून ते इतर प्राधिकरणांच्या किंवा सार्वजनिक संस्थांच्या अखत्यारितील आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.), महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय विमानतळ प्राधिकरण यासारख्या संस्थांचा समावेश आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान खड्डे आढळतात किंवा दुरूस्तीयोग्य रस्त्यांची डागडुजी करावी लागते. ही शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक खात्याद्वारे वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही नियमितपणे केली जाते. एखाद्या ठिकाणी खड्डे आढळल्यास ते भरण्याची कार्यवाही लवकरात – लवकर करता यावी, यादृष्टीने नागरिकांना देखील सहज-सुलभ पद्धतीने खड्डे विषयक तक्रार नोंदवता यावी, यासाठी महानगरपालिकेने पारंपरिक पद्धतीने लेखी तक्रार करण्यासह तंत्रज्ञानाचा वापर करुन तक्रार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
बांगर पुढे म्हणाले की, दूरध्वनी, व्हॉटस्ॲप आणि समाजमाध्यमांद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदविता येईल. या सर्व माध्यमातून प्राप्त होणा-या तक्रारी २४ तासांत निकाली काढण्यात येतील. या तक्रारी २४ तासांत निकाली निघतात किंवा नाही हे पाहण्यासाठी ‘इंटिग्रेटेड डॅशबोर्ड ‘ विकसित केला जात आहे. जेणेकरून तक्रार निकाली निघते किंवा नाही, किती वेळात निकाली निघते, प्रलंबित असेल तर कधीपासून प्रलंबित आहे, निकाली निघालेल्या तक्रारींबाबत तक्रारदाराचा ‘फीडबॅक’ काय आहे, तक्रार निकाली निघाल्याबद्दल तक्रारदार समाधानी आहे का? या गोष्टींची माहिती या डॅशबोर्डद्वारे कळू शकेल. ‘MyBMC Pothole FixIt’ या ॲपमध्ये वापरकर्ता स्नेही (युजर फ्रेंडली) बदल केले जात आहेत. तक्रार सादर करताना कमीत कमी ‘क्लिक’ वर तक्रार सादर करता आली पाहिजे, मोबाईल क्रमांकाच्या आधारावर तक्रार सादर करता यावी, ई मेल आयडीची गरज नसावी, अशी पद्धती विकसित केली जात आहे. तक्रार नोंदविल्यानंतर जेव्हा खड्डा भरला जाईल, त्यावेळी संदेश पाठवून तक्रारकर्त्याला खड्डा भरल्याची माहिती महानगरपालिकेकडून दिली जाईल.
रस्त्यांची परिस्थिती पावसाळ्यादरम्यान चांगली रहावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पावसाळापूर्व कामे हाती घेऊन दुरूस्तीयोग्य रस्त्यांची डागडुजी केली आहे. मात्र, तरीदेखील पावसाळ्या दरम्यान जर खड्डे पडले तर ते विनाविलंब दुरुस्त व्हावे यासाठी महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी स्वतःहून सक्रीयपणे (प्रोॲक्टिव्हली) खड्डे शोधून काढणे आणि ते २४ तासात बुजविण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र, त्याचवेळी नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांकडून येणारा प्रतिसाद (फीडबॅक) महानगरपालिकेसाठी महत्वाचा आहे. या प्रतिसादाच्या आधारावर खड्डे भरण्याची कारवाई विनाविलंब केली जाईल, यासाठी महानगरपालिका प्रशासन दक्ष राहील, असा विश्वासदेखील श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांबाबत काही तक्रार करावयाची असल्यास ती नागरिकांना सहजपणे करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘MyBMC Pothole FixIt’ हे भ्रमणध्वनी ॲप तयार केले आहे. भ्रमणध्वनीतील ॲप सुरु करुन जीपीएस / लोकेशन ऑन करुन रस्त्यावरील खड्डय़ाचे छायाचित्र टिपावे व ते अपलोड करावे. ज्यामुळे रस्त्यावर नेमक्या कोणत्या ठिकाणी खड्डा आहे ? या विषयीची निश्चित माहिती उपलब्ध होऊन खड्डे भरण्याची कार्यवाही लवकर करणे शक्य होते. या ॲपमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारास एक विशिष्ट तक्रार क्रमांक प्राप्त होतो. या तक्रार क्रमांकाच्या आधारे ॲपमध्ये सर्च केल्यास तक्रारीविषयक सद्यस्थिती तक्रारदारास लगेच दिसू शकते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेच्या संबंधित अभियंता / कंत्राटदाराद्वारे खड्डा भरण्याची व रस्ता व्यवस्थित करण्याची कार्यवाही केल्यानंतर त्या ठिकाणचा कार्यवाही नंतरचे सुधारणा केल्याचे छायाचित्र ॲपमध्ये अपडेट केले जाते. ज्यामुळे तक्रारदारास त्याने केलेल्या तक्रारीचे निराकरण झाल्याची खात्रीशीर माहिती मिळते. खड्डय़ांविषयीच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेने कार्यान्वित केलेल्या या ॲपमुळे नागरिकांना खड्डेविषयक तक्रारी नोंदवणे अधिक सुलभ झाले आहे. अँड्रॉइड आणि आय. ओ. एस. प्रणालीच्या भ्रमणध्वनीमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
दूरध्वनी क्रमांक, समाजमाध्यमे
महानगरपालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे विषयक किंवा दुरूस्तीयोग्य रस्त्यांविषयक तक्रार करावयाची असल्यास ती ‘१९१६’ (One Nine One Six) या दूरध्वनी क्रमांकावर करता येईल. हा दूरध्वनी क्रमांक २४ तास अव्याहतपणे कार्यरत असतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या @mybmc या समाजमाध्यमांवरील ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटला टॅग करुन देखील नागरिक खड्डेविषयक तक्रार नोंदवू शकतात.