26.6 C
New York

Narendra Modi : EVM जिवंत आहे की मेलं? मोदींचा विरोधकांना टोला

Published:

नवी दिल्ली

पंतप्राधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची NDA च्या नेतेपदी निवड (NDA Parliamentary Meeting) करण्यात आली. या निवडीला राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला. अमित शाह यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनत आहेत, त्यासाठीही शुभेच्छा दिल्या. NDA संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर PM मोदी म्हणाले, 4 जून रोजी निकाल लागत होता, तेव्हा मी इतर कामात व्यस्त होतो. मला फोन येत होते. आकडे सांगितले जात होते. मी त्यांना म्हटलं, आकडे वगैरे ठिक आहे, पण ईव्हीएम (EVM) जिवंत आहे की मेलं? आता विरोधकांच्या तोंडाला टाळं लागलंय. या लोकांनी भारताच्या लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडवला. सातत्याने ईव्हीएमला शिव्या घातल्या. असा हल्लाबोल विरोधकांवर नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, NDA ही भारतातील सर्वात यशस्वी निवडणूकपूर्व आघाडी आहे. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या समूहाचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली ही आनंदाची बाब आहे. जे पक्ष विजयी झाले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. मी खूप भाग्यवान आहे. एनडीएचा नेता म्हणून सर्व घटक पक्षांनी एकमताने माझी निवड करून मला नवीन जबाबदारी दिली आहे, त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. 2019 मध्ये मी एका गोष्टीवर भर दिला तो म्हणजे विश्वास. जेव्हा तुम्ही मला पुन्हा एकदा ही जबाबदारी द्याल, तेव्हा याचा अर्थ असा की आमच्यातील विश्वासाचा पूल अतूट आहे. हे अतूट नाते विश्वासाच्या भक्कम पायावर आधारित आहे. हे सर्वात मोठे भांडवल आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर हा निकाल म्हणजे एनडीएचा महाविजय आहे, हेच लोक सांगतील. जगही हे मान्य करेल. याआधीसुद्धा एनडीए होती, आजसुद्धा एनडीए आहे आणि उद्यासुद्धा एनडीएच राहील. दहा वर्षांनंतरही काँग्रेसने 100 च्या आकड्यालाही स्पर्श केला नाही. देशाला फक्त आणि फक्त एनडीएवरच विश्वास आहे. इतका विश्वास आहे म्हणजे स्वाभाविकच लोकांच्या अपेक्षा वाढल्या असतील. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करू. आम्हाला आणखी जलद गतीने देशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत.

नरेंद्र मोदी म्हणाले की, एनडीए म्हणजे न्यू इंडिया, डेव्हलप्ड इंडिया, अॅस्पिरेशनल इंडिया. आमच्याकडे हे सर्व पूर्ण करण्यासाठी रोडमॅप आहे. इंडिया आघाडीची ओळख घोटाळ्यांचीच आहे. नाव बदललं तरी ओळख मात्र तीच आहे. जनतेनं त्यांच्या याच ओळखीला नाकारलं आहे. दक्षिणेत आम्ही चांगलं यश मिळवलं. कर्नाटक आणि तेलंगणात मोठा विजय मिळाला. तामिळनाडूतही जोरदार प्रचार केला. तामिळनाडूत जागा जिंकलो नसेल, पण ज्या वेगाने एनडीएचा व्होट बँक वाढलं आहे, त्यावरून उद्या काय होणार हे स्पष्ट होत आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, नडीएतील सर्व पक्षांचे सदस्य माझ्यासाठी समान आहेत. आपण विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करू. आपण विकासाचा नवा अध्याय लिहू. दक्षिण भारतात एनडीएनं नव्या भारताचा पाया रचला आहे. गरीबांचं कल्याण हे माझ्या केंद्रस्थानी आहे. एनडीएनं या देशाला सुशासन दिलं आहे. गेल्या दहा वर्षांत लोकांनीसुद्धा हे अनुभवलं. एनडीए हा मजबूत भारताचा आत्मा आहे. मी हे विश्वासाने सांगतो ही सर्वांत यशस्वी आघाडी आहे. या आघाडीने पाच-पाच वर्षांचे तीन टर्म यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत आणि आता चौथ्या टर्ममध्ये प्रवेश करतोय.

नरेंद्र मोदी म्हणाले की, 22 राज्यांनी एनडीएला सेवा करण्याची संधी दिली. आम्हाला बहुमत मिळालं आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक असतं. मात्र देश चालवण्यासाठी सर्वमत खूप गरजेचं असतं. हे मी याआधीही अनेकदा म्हणालो आहे. आपल्या सर्वांमध्ये विश्वासाचा सेतू मजबूत आहे. हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण आहे. मी तुम्हा सर्वांचे जितके आभार मानू तितकं कमी आहे. विश्वास हीच मोठी संपत्ती आहे. माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. इतक्या मोठ्या समूहाचं स्वागत करण्याची संधी आज मला मिळाली आहे. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र अथक परिश्रम केला. आज मी त्यांना वाकून नमस्कार करतो असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, जे राजकीय तज्ज्ञ आहेत, जर त्यांनी मुक्त मनाने विचार केला तर एनडीए हे सरकार मिळवण्याचा किंवा सत्ता टिकवण्यासाठी जमलेली टोळी नाही. तर देशसेवेसाठी कटिबद्ध असलेला हा समूह आहे. देशाच्या राजकारणातील ही ऑरगॅनिक अलायन्स आहे. आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी विश्वासाने बिजं रोवली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आमच्या सर्वांजवळ या महान नेत्यांचा वारसा आहे त्याचा आम्हाला गर्व आहे, असेही मोदींनी भाषणात म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img