नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) महायुतीला अपेक्षित असलेले यश मिळाले नाही आहे. भाजपच्या (BJP) वतीने राज्यात आपकी बार 45 पारचा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीला 17 जागा मिळाल्या आहे. त्यामुळे या संपूर्ण अपयशाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदाचा राजीनामा देण्याचे निर्णय जाहीर केला होता. आज एनडीएच्या (NDA) दिल्लीतील बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात दिल्लीतील वातावरण तापलेले आहे. देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणी फडणवीस यांचे अतिशय जवळचे असणारे संकटमोचन म्हणून नामांकित असलेले गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या पदावर विनोद तावडेंसह इतर नावे देखील चर्चेत आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक संपली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे पी नड्डा यांची देखील भेट घेतली. ते राजीनाम्यावर ठाम आहेत. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांनी काम सुरु ठेवण्याचा सल्ला दिला. राजीनामा देऊ नका, असे शाह यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या करिता पक्ष बांधणीसाठी पूर्णपणे पक्षाचे काम करण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून पुन्हा 2014 प्रमाणे धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. तर विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या राज्यातील फेरबदल झाल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा काढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रात भाजपची लोकसभा सदस्य संख्या २३ वरून नऊ झाली आहे. याच कारणामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाकरिता राज्यातील पाच नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.