मुंबई
आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही नोंदी घेतल्या असून त्यातून काही निर्णय घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत असे सांगतानाच जनता जनार्दन सर्वस्व असते. जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे. जनतेचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता आम्ही जीवाचे रान करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या दोन्ही बैठकीत लोकसभेत कशाप्रकारे निकाल लागले याबद्दल चर्चा करण्यात आली. या बैठकीला काही आमदार त्यांच्या खाजगी अडचणीमुळे तर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे ऑपरेशन झाल्याने येऊ शकले नाहीत अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. आमचे आमदार विरोधकांच्या संपर्कात आहेत अशा ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही सर्व आमदार आमच्यासोबत आहेत हे चित्र आजच्या बैठकीत पहायला मिळाले असेही अजित पवार यांनी विरोधकांनी उठवलेल्या वावडयांवर बोलताना स्पष्ट केले. बारामतीचा जो कौल लागला आहे. त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकित झालो आहेच शिवाय मी अनेक वर्षे तिथे काम करतोय. कोणत्याही निवडणूका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता. यावेळेला काय घडलंय माहीत नाही असेही अजित पवार म्हणाले.
यापुढे आम्ही जनतेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमधील प्रमुखांशी चर्चा करुन लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात निर्णय होत असताना ज्या त्रुटी राहिल्या. कुठे आम्ही कमी पडलो यावर चर्चा झाली. या निवडणुकीत मुस्लिम समाज आमच्यापासून दूर गेला होता. संविधानाबद्दल जो मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यंदा ‘अब की बार चारशे पार’ हे संविधान बदलण्यासाठी आहे असा प्रचार केला. त्या प्रचाराला मागासवर्गीयांनी साथ दिली. शिवाय आरक्षणाचा मुद्दा मराठवाडयातील जागा बघितल्या त्यात संभाजीनगरची जागा सोडली तर त्या परिसरात महायुतीची एकही जागा येऊ शकली नाही. या काही गोष्टी निवडणूकीत आम्हाला पहायला मिळाल्या आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले. आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही नोंदी आम्ही केल्या आहेत त्यातून निर्णय घ्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने आमची पुढची वाटचाल करणार आहोत. या तीन चार गोष्टींचा फटका आम्हाला निश्चित बसला. हे मान्य करावे लागणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.