मुंबईत अनेक ठिकाणी पावसाने (Mumbai Rain) हजेरी लावली आहे. प्रचंड उकाड्यापासून बुधवारी सकाळीच मुंबईकरांना दिलासा मिळाला. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे. गेल्या काही दिवसांत प्रचंड उकाडा वाढला होता आणि अशातच पाऊस कधी येणार, याची चातकासारखी वाट लोकं बघत होते. त्यातच बुधवारी दादर, परेल, प्रभादेवी आणि माहीम भागांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या शिवाय कोकण पट्ट्यात ढगाळ वातावरण आहे. तब्बल अर्धा तास या परिसरात पाऊस पडत होता. लवकरच मान्सूनला सुरुवात होईल त्याआधी पडलेला हा पूर्वमोसमी पाऊस आहे. वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता (Maharashtra Weather Forecast Today) आहेत. पूर्व मोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार झालंय. त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानामध्ये वेगाने घट होत आहे.
Mumbai Rain ठाणे, पालघर, जोगेश्वरी भागांतही पाऊस
हवामान विभागानेही येत्या ४८ तासांत पाऊस पडेल, असं म्हटलं होतं. ज्यामध्ये कोकण, उत्तर कोकण या ठिकाणांचा समावेश होता. मुंबईत ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची अवकाळी पावसानंतर सकाळी पाऊस पडण्याआधी तारांबळ उडाली. काहीजण आधीच घराबाहेर पडताना छत्री घेऊन बाहेर पडले, तर पहिल्या पावसात भिजण्याचा आनंदही काहीजणांनी घेतला. मुंबईच्या उपनगरीय भागांतही पावसाने हजेरी लावली आहे. ४८ तासांत पावसाची शक्यता ठाणे, पालघर, जोगेश्वरी या भागांतही हवामान विभागाने दिली.
Mumbai Rain मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे
५ जून ते ८ जून दरम्यान नाशिक, अहमदनगर, पुणे कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात आजपासून पुढील पाच दिवस औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या असलेल्या गोव्यात दाखल झाले असतानाच महाराष्ट्रावर बुधवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला. त्यासाठी व महाराष्ट्राला हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे.