लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर राज्यातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निकालाने महाराष्ट्रात महायुतीसह भाजपाची दाणादाण उडाली. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र सगळीकडेच महायुतीची पिछेहाट झाली. उत्तर महाराष्ट्रात तर महायुतीच्या हातातून सहा मतदारसंघ निसटले. जळगाव आणि रावेर या दोन मतदारसंघांनी नामुष्की थोडीफार टाळली. या व्यतिरिक्त नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर दक्षिण, शिर्डी, दिंडोरी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीचं वर्चस्व आता संपुष्टात आलं आहे असं म्हणण्यास हरकत नाही.
Lok Sabha Result नंदूरबारमध्ये हिना गावितांची हॅट्ट्रीक हुकली
नंदूरबार मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांना पराभवाचा धक्का बसला. येथे काँग्रेस नेते केसी पाडवी यांचे पुत्र डॉ. गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. येथील अटीतटीच्या लढतीत पाडवी यांनी बाजी मारली. नंदूरबार जिल्ह्यात आजमितीस काँग्रेसचे दोन आमदार आहेत. तीन भाजपचे तर एक अपक्ष आमदार आहे. अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसचे केसी पाडवी, नवापूरमध्ये शिरीषकुमार नाईक आमदार आहेत. शहादामध्ये राजेश पाडवी, नंदूरबारमध्ये विजयकुमार गावित, शिरपूरमध्ये काशीराम पावरा भाजपचे आणि साक्री मतदारसंघात मंजुळा गावित अपक्ष आमदार आहेत.
Lok Sabha Result धुळ्यात काँग्रेसच्या बच्छाव होणार खासदार
धुळे लोकसभा मतदारसंघातही अटीतटीची लढत पाहण्यास मिळाली. येथे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधता आली नाही. महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी जोरदार टक्कर देत विजय खेचून आणला. सन 2019 मधील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून कुणाल पाटील रिंगणात होते. तर आमदार अनिल गोटे अपक्ष उमेदवार होते.
भाजपची बालेकिल्ल्यातच पिछेहाट!
Lok Sabha Result रावेरमध्ये रक्षा खडसेंनी बाजी मारली
अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. तरीही भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली होती. यात एक चांगली गोष्ट म्हणजे एकनाथ खडसेंनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्याचा फायदा भाजपला झाला. येथे रक्षा खडसे विजयी झाल्या. येथे महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटील यांना उमेदवारांनी नाकारलं.
Lok Sabha Result तिरंगी लढतीत नाशकात शिंदेंचा खासदार पडला
नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहण्यास मिळाली. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी पराभवाचा धक्का दिला. शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यांच्या उमेदवारीचा फटका महायुतीला बसला. अटीतटीच्या लढतीत हेमंत गोडसेंची खासदारकीची हॅट्ट्रीक हुकली. उत्तर महाराष्ट्रातील हक्काची जागा महायुतीच्या हातून निसटली.
Lok Sabha Result नगरमध्ये तुतारी वाजली, चुरशीच्या लढतीत लंके विजयी
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर तुतारी वाजली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यापेक्षा जवळपास 31 हजार मतांची आघाडी घेतली. या मतदारसंघात चांगलीच चुरस रंगली होती. अनेक फेऱ्यात विखे आणि लंके यांच्यात अटीतटीची लढत झाली पण अखेर नीलेश लंके यांनी विजयी झाले.
2019 च्या निवडणुकीत सुजय विखे यांना 7,04,660 मते मिळाली होती तर संग्राम जगताप यांना 4,23,186 मते मिळाली होती. या निवडणुकीत सुजय विखे तब्बल 2,81,526 इतक्या मताधिक्याने विजयी झाले होते. यंदा मात्र विखेंना विजयी वाटचाल कायम राखता आली नाही. निलेश लंकेंनी टफ फाईट देत विजय खेचून आणला. विखेंचा हा पराभव भाजप आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Lok Sabha Result शिर्डीत ठाकरेंची मशाल पेटली
शिर्डी लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होती. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने निवडणूक तिरंगी झाली होती. या तिरंगी लढतीत ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पराभवाचा धक्का बसला. सन 2014 मध्ये तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेसनं त्यांना तिकीट दिलं होतं. वाकचौरेंनी पक्ष सोडल्याने शिवसेनेनं मग सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मोदी लाटेत अवघ्या सोळा दिवसात लोखंडे खासदार झाले. सन 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या मागे पुढे विखे पिता पुत्र भाजपमध्ये आले. यानंतरही शिवसेनेने पुन्हा लोखंडे यांनाच खासदारकीचं तिकीट दिलं. आताच्या निवडणुकीत अकोलेत 1,55,930, संगमनेरात 1,84,031, शिर्डीत 1,78,716, कोपरगावात 1,71,059, श्रीरामपुरात 1,93,605 आणि नेवासा विधानसभा मतदारसंघात 1,73,957 असे एकूण 10,57,298 मतदान झाले होते.
Lok Sabha Result नाराजीनंतरही भाजपनं जळगाव राखलं
मागील वीस वर्षांपासून जळगावात भाजपाचा खासदार आहे. यंदा ठाकरे गटाने करण पवार यांना तर भाजपाने स्मिता वाघ यांना तिकीट दिलं होतं. या मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या स्मिता वाघ निवडून आल्या. ठाकरे गटाचे करण पवार यांना पराभवाचा धक्का बसला. जळगावमध्ये जळगाव शहर, अमळनेर, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव आणि जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आहेत. जळगाव आणि चाळीसागावात भाजपाचे आमदार आहेत. अमळनेरमध्ये अजित पवार गटाचा आमदार आहे. तसेच जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि एरंडोलध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.
जळगाव मतदारसंघात यंदा 2019 च्या तुलनेत मतदान वाढले. 2019 मध्ये येथे 56.11 टक्के मतदान झालं होतं तर यंदा 57.70 टक्के मतदान झालं. यामध्ये जळगाव शहर 52.90 टक्के, जळगाव ग्रामीण 62.60 टक्के, अमळनेर 55.94 टक्के, एरंडोल 61.76 टक्के, चाळीसगाव 55.01 टक्के आणि पाचोरा विधानसभा मतदारसंघात 59.82 टक्के इतकं मतदान झालं होतं.
Lok Sabha Result दिंडोरीत भास्कर भगरेच खासदार, भारती पवार पराभूत
दिंडोरी मतदारसंघात मोठा उलटफेर झाला. या मतदारसंघात विद्यमान खासदार आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले. दिंडोरी मतदारसंघात यंदा 66.75 टक्के इतकं मतदान झालं होतं. 2019 मधील निवडणुकीत 65.65 टक्के मतदान होतं. म्हणजेच यंदा मतदानात 1.01 टक्का वाढ झाली. मतदानाचा हा वाढलेला टक्का भारती पवारांना झटका देणारा ठरला.