10.1 C
New York

Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले…

Published:

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निकाल (Loksabha Election Result) हाती आले आहेत. यंदा भाजपप्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळवता आलं नाही. भाजपला मोठं नुकसान सहन कराव लागलं आहे. येत्या 9 जून रोजी एनडीए सरकारचा शपथविधी यातच आता होऊ शकतो अशी बातमी समोर येत आहे. आज सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात एनडीएने आघाडी घेतली होती. नंतर मात्र इंडिया आघाडीने मुसंडी मारली. दोन्ही आघाड्यांत पुढे चुरशीचा सामना रंगला होता.

Loksabha Election Result भाजपला अजूनही सरकार स्थापन करण्याची संधी

आता या निकालानंतर भाजपाच्या पराभवाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. परंतु भाजपला अजूनही सरकार स्थापन करण्याची संधी आहे. कारण भाजपने जवळपास 239 जागा जिंकल्या आहेत. तर 294 जागांवर भाजपप्रणित एनडीए आघाडीने आघाडी घेतली आहे. त्यामुळे एनडीए आघाडीतील घटक पक्ष फुटले नाहीत तर भाजपला अजूनही सरकार स्थापन करण्याची संधी आहे. त्यामुळे आता भाजपने त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप हाच एनडीए आघाडीत अजूनही सर्वात मोठा पक्ष आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीत अन्य प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यात काँग्रेस असतानाही ताकदवान राहिले. तसेच एनडीएमध्ये तेलुगू देसम पार्टी (16 जागा), जेडीयू (12 जागा), लोजपा (5) आणि शिंदे शिवसेना (7 जागा) भाजपापासून वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले.

Loksabha Election Result सपाने जवळपास 40 जागा जिंकल्या.

इंडिया आघाडीने लहान पक्षांना सोबत घेत भाजपसमोर आव्हान उभे केले. द्रमुकने 20 पेक्षा जास्त जागा तामिळनाडूत जिंकल्या तर टीएमसीने पश्चिम बंगालमध्ये 30 जागा जिंकल्या. या व्यतिरिक्त समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा झटका दिला. सपाने जवळपास 40 जागा जिंकल्या. आम आदमी पार्टीने पंजाबात तीन जागा जिंकल्या. शरद पवार गटाने 7, ठाकरे गटाने 9, राजदने चार जागांवर आघाडी घेतली. या पक्षांचा आघाडीला मोठा फायदा झाला. इंडिया आघाडीने यावेळी नेतृत्वाची घोषणा करत आघाडी तुटण्यापासून वाचवली. आघाडीतील नेत्यांना एका मंचावर आणत त्यांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. एनडीएकडून इंडियावर नेतृत्व अभावाची टीका केली जात होती परंतु, आघाडीच्या नेत्यांनी या टीकेकडे जास्त लक्ष दिले नाही.

Loksabha Election Result महाराष्ट्रात फक्त 9 जागा मिळाल्या

एनडीएला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात मोठा झटका बसला. उत्तर प्रदेशातील 80 पैकी फक्त 33 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत. महाराष्ट्रात फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये फक्त 10 जागा मिळतील अशी शक्यता आहे. मागील 2019 निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला 62 जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात 23 आणि बंगालमध्ये 18 जागा मिळाल्या होत्या. या तीन राज्यात भाजपाला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. हिंदी पट्ट्यातील राज्यांचा विचार केला तर हरियाणात भाजपला 2019 मध्ये 10 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र सहा जागांवर आघाडी आहे. याव्यतिरिक्त राजस्थानात फक्त 14 जागा मिळाल्या आहेत. मागील वेळेच्या तुलनेत 10 जागा कमी झाल्या आहेत. बिहारमध्ये 2019 मध्ये भाजपला 15 जागा मिळाल्या होत्या. यावेळेस फक्त 12 जागा मिळताना दिसत आहेत. झारखंड मध्येही 11 जागा मिळाल्या होत्या त्या आता आठ झाल्या आहेत.

यानंतर आता राष्ट्रपती भवनातून नवीन सरकारच्या शपथविधीबाबत माहिती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्या आयोजनासाठी राष्ट्रपती भवन सर्वसामान्य लोकांसाठी 5 ते 9 जून दरम्यान बंद राहिल. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एनडीए आघाडीला 290 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. तर इंडिया आघाडीने 230 जागांवर विजय मिळवला आहे. यातील शंभर जागांवर काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली आहे. भाजपला सर्वाधिक नुकसान महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक नुकसान झाले. 2019 च्या तुलनेत या राज्यातील भाजपाच्या जागा कमी झाल्या. इंडिया आघाडीत सहभागी पक्षांनी या राज्यात चांगली लढत देत भाजपला बॅकफूटवर ढकलले.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल देशातील नागरिकांचे आभार मानले. देशातील जनतेने तिसऱ्यांदा आपला विश्वास टाकला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ज्या समर्पित भावनेने काम केलं, मेहनत घेतली त्यांचे मी मनापासून आभार मानतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img