मुंबई
भारतीय जनता पार्टीकडून (BJP) हिंदुत्ववादी चेहरा म्हणून प्रचार करणाऱ्या दोन्ही महिला नेत्यांचा पराभव लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) झाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला (BJP) सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगर गाठता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. यामध्ये भाजपला अपयश मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.
हैदराबादमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सुरुवातीपासूनच तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून मोठी आघाडी घेतल्याचं दिसून आलं आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत असदुद्दीन औवेसी यांनी 3 लाखांपेक्षा जास्त आघाडी घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे येथील भाजप उमेदवार माधवी लता यांचाही पराभव झाल्याचं चित्र येथील मतदारसंघात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माधवी लता यांचं कौतुक केलं होतं. तर नवनीत राणा यांनीही त्यांच्या प्रचारासाठी सभा घेऊन माधवी लता यांना निवडून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र भाजपच्या दोन्ही महिला नेत्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. हिंदू शेरणी म्हणत या दोन्ही महिला नेत्यांचा प्रचार निवडणूक काळात दिसून आला. मात्र जनतेनं दोन्ही हिंदू शेरणींना नाकारल्याचं चित्र आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघातून बळवंत वानखडे विजयी झाले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जवळपास पूर्ण झाली असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यामुळे निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनीत राणा यांना पराभवाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात हिंदू शेरणी म्हणून नवनीत राणांचा उल्लेख त्यांचे पती रवि राणा यांनी केला होता. तर, तेलंगणातील हैदराबादमध्ये असदुद्दीन औवेसींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांचाही पराभव झाला आहे. निवडणूक प्रचारात माधवी लता यांचीही प्रतिमा हिंदू शेरणी म्हणून प्रमोट करण्यात आली होती. खासदार नवनीत राणा यांनीही त्यांच्यासाठी हैदराबादमध्ये प्रचार केला. त्यावेळी औवेसींवर हल्लाबोल करताना त्यांनी हिंदू व जय श्रीरामच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला होता. मात्र जनतेने भाजपच्या या दोन्ही उमेदवारांना नाकारलं आहे. माधवी लता यांचा हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून आणि नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. दरम्यान निकालाच्या घोषणेनंतर नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा मतमोजणीची मागणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.