मुंबई
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राज्य निवडणूक आयोगाला (Maharashtra State Election Commission) उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितादरम्यान मतदान सुरु असताना संध्याकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी 20 मे ला पत्रकार परिषद घेतली होती. या दिवशी मुंबईतील सर्व सहा लोकसभा जागांसह राज्यातील एकूण 13 जागांवर मतदान पार पडलं होतं.
मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची केंद्रिय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. मतदान काळात पत्रकार परिषद घेत आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश आता केंद्रिय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
मुंबईसह राज्यातील १३ लोकसभा मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान झाले. या मतदानादरम्यान मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी मतदान संपायला १ तास बाकी असताना पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मतदानाला होणाऱ्या विलंबावरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबतची तक्रार दिली होती. तसेच राज्य निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेचा अहवाल केंंद्रिय निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. यावरुनच आता केंद्रिय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.