महाराष्ट्रात पाच टप्प्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (Loksabha Election) घेण्यात आली असून राज्यातील 48 मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून मंगळवारी ४ जून २०२४ रोजी सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि सुरळीत होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे. राज्यातील ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात एकूण २८९ हॉल मध्ये ४ हजार ३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (आय.ए.एस.) आणि राम प्रकाश (एस.सी.एस.) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (आय.ए.एस) आणि नवाब दीन (एस.सी.एस.) यांची नियुक्ती केली आहे.
मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांचा सातत्याने आढावा सुरू आहे. मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी प्रत्येक टेबलवर नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदारसंघासाठी १४ टेबल व सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सकाळी 8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.
महायुतीचे तिन्ही पक्ष विधान परिषदेची निवडणुकीमध्ये समोरासमोर
मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.
Loksabha Election मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू
जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने दिनांक २ जून २०२४ रोजी सकाळी ६:०० ते दिनांक ५ जून २०२४ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत शिवडी येथील मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस उपायुक्त (अभियान) बृहन्मुंबई यांनी निर्गमित केले आहेत.