3 C
New York

Arunachal Pradesh : महाराष्ट्रात नाही पण, अरुणाचलात अजितदादांचा जलवा

Published:

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच ईशान्य भारतातील (Assembly Election Result 2024) राज्यानं भाजपला गुडन्यूज दिली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा (Arunachal Pradesh) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून आतापर्यंत भाजपने 37 जागा जिंकल्या आहेत. या राज्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घोडदौड करताना दिसत आहे. येथे राष्ट्रवादीचे तीन उमेदवार सध्या आघाडीवर असून विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहेत. दुसरीकडे सिक्कीम विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी सुरू असून येथे एसकेएम पक्ष 20 जागांवर विजयी झाला असून 11 जागांवर आघाडीवर आहे.

लोकसभा निवडणुकीबरोबर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. अरुणाचल प्रदेशात भाजप पुन्हा क्लीन स्वीप करताना दिसत आहे. या राज्यांचे निकाल हाती येत असून भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत 37 जागांवर विजय मिळवला आहे. एनपीईने एक तर अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली आहे.या दोन्ही राज्यात विधानसभेसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. अरुणाचल प्रदेशात 60 आणि सिक्कीममध्ये 32 विधानसभा जागा आहेत. या निवडणुकीचे निकाल आता जाहीर होत आहेत. अरुणाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांती मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. भाजप आणि काँग्रेसचेही उमेदवार आहेत. मात्र या दोन्ही पक्षांना येथे विशेष काही करता आले नाही. मतदारांनी पुन्हा सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चालाच कौल दिल्याचं आतापर्यंतच्या निकालांवरून दिसून येत आहे.

अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये आज मतमोजणी

सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने आतापर्यंत 23 जागा जिंकल्या आहेत तर 8 मतदारसंघात एसकेएमचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर विरोधी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट फक्त एका मतदारसंघात आघाडीवर दिसत आहे. सिक्कीमध्ये मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वात एसकेएम पक्षाची सत्ता आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग (एसडीएफ), भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया, प्रेमसिंग तमांग यांची पत्नी कृष्णाकुमारी राय, रुप नारायण चामलिंग ह हे काही प्रमुख उमेदवार सिक्कीमच्या मैदानात होते.

दरम्यान, आज सायंकाळपर्यंत दोन्ही राज्यांतील निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. परंतु, सध्याच्या निकालावरून अरुणाचल प्रदेशात भाजप तर सिक्कीम राज्यात सिक्कीम क्रांतीकारी पक्षाला राज्यातील जनतेनं कौल दिल्याचं स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img