राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) येत्या काळात भाजप किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही असाच दावा केला होता. जयंत पाटील यांना पक्षात घेण्याचा निर्णय हायकमांडने घेतला तर त्याचे स्वागतच असेल, असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दरेकर म्हणाले, ”जयंत पाटील यांचा नेहमीच एक पाय पक्षात आणि एक पाय बाहेर असतो. त्यांच्या पक्ष सोडून जाण्याच्या चर्चा यापूर्वीही झाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भवितव्य त्यांना माहित आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते ठोस निर्णय घेऊ शकतात,” असा दावा दरेकरांनी केला आहे. यापूर्वीच्या चर्चांना जयंत पाटील यांनी उत्तर देत पक्ष सोडण्याचे दावे फेटाळून लावले होते. मात्र, यावेळी जयंत पाटील यांनी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Jayant Patil : जयंत पाटलांची पक्षात कुचंबना
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही दरेकरांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. ”जयंत पाटील यांची राष्ट्रवादीत कुचंबना होत आहे. त्यांना रोहित पवार यांच्या सांगण्यानुसार काम करावे लागते, यापेक्षा दुसरे दुर्दैव काही नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जयंत पाटील निष्ठेने राहिले. त्यांनी पक्षाची नव्याने मोट बांधण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि आता, त्याची उपेक्षा होत असेल तर जयंत पाटील नक्कीच पक्ष सोडतील,” असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
हेही वाचा : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांनी आयुक्तांना फोन केला होत का?
Jayant Patil : हायकमांडच्या निर्णयाचे स्वागत करू-पटोले
दरेकर आणि शिरसाट यांच्या दाव्यामध्ये तथ्य असू शकते, याला दुजोरा देणारे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ” काँग्रेस विचाराचे अनेक लोक पक्षात परतत आहेत. त्यांचे स्वागतच आहे. हायकमांडने याबाबत काही निर्णय घेतला तर त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा शिंदे गट अस्तित्वात राहतील का, हा प्रश्न आहे. देशासह राज्यात परिवर्तनाची लाट आहे,” असे पटोले म्हणाले.