मुंबई
राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनुस्मृतीचा निषेध करत महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्यायले. त्यानंतर, मनुस्मृती फाडत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती (Manusmriti) पुस्तकावरील बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रही फाडण्यात आले. त्यानंतर, विरोधकांनी आव्हाडांना चांगलच धारेवर धरलं आहे. तसेच त्यांच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या जात असून आता त्यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे. मात्र आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आव्हाड यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट (Facebook Post) केली आहे. आव्हाडांवर टीकेची झोड उठविणाऱ्या विरोधकांना देखील अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काही सवाल उपस्थित करत जाब विचारला आहे.
सुषमा अंधारे यांच्या पोस्ट मध्ये काय
सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. कारण मित्र असे कोणतेही स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार मांडलेल्या भूमिका आणि केलेली आंदोलन सर्वांना ज्ञात आहे. शिवाय नकळतपणे घडलेल्या कृतीबद्दल त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे. पण तरीही याच्या आडून राजकारण करणाऱ्या आणि बाबासाहेबांबद्दल बेगडी प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांसाठी एक सवाल आहे. बाबासाहेबांनी मांडलेला प्रत्येक विचार जर शिरोधार्य असेल तर त्याच बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. कारण मनुष्यमात्राला असमान मानणारा विचार हा मानवी कल्याणाचा विचार असू शकत नाही असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले. त्याच मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा अव्हेर करत सरळ सरळ बाबासाहेबांच्या चळवळीला मात देण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून होत आहे. जर जितेंद्र आव्हाड्यांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर आव्हाड ज्या मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होते यावर तुमचं मत काय आहे?
– बाबासाहेबांबद्दल बेगडी प्रेमाचा उमाळा दाखवणाऱ्या तमाम छुपे आणि उघड भाजप समर्थकांनी हे स्पष्ट करावे की मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात समावेशन होत असताना तुम्ही कोणत्या बिळात लपला होतात ?
– त्यासाठी तुम्ही थेटपणे शिक्षण खात्याच्या संबंधित मंत्र्यांना जाहीर प्रश्न कधी विचारले आहेत त्याचा विरोध करायचा म्हणून शिक्षण खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही कधी मागणार आहात?
– बाबासाहेबांचा अपमान जेव्हा भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी केला त्या वेळेला आत्ताचे भाजपचे छुपे आणि उघड समर्थक हे चंद्रकांत पाटलांच्या बद्दल मूग गिळून गप्प का बसले होते?
– बाबासाहेबांबद्दल खरंच प्रेमाचे उमाळे येत असतील तर इंदू मिलच्या जागेवर कुदळ मारायला आलेले मोदीजी अजून तिथे विटही रचली गेली नाही. यावर हे छुपे आणि उघड समर्थक मोदींना थेटपणे जाब विचारत मोदींना सत्तेतून पायउतार करण्याची भाषा करतील का?
जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळली गेले तेव्हा ती प्रत जळणाऱ्या आरएसएस समर्थकांच्या विरोधात आत्ताचे भाजपचे छुपे किंवा उघड समर्थक रस्त्यावर का उतरले नाहीत?
बाबासाहेब आणि बाबासाहेब यांच्या प्रत्येक कृतीबद्दल जर अभिमान असेल तर मग भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या बद्दल थेट भूमिका या छुपे किंवा उघड समर्थकांनी का घेतली नाही ?
तुम्ही या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही कारण तुमचा बौद्धिक हलकटपणा चळवळीत काम करणारे सच्चे कार्यकर्ते अभ्यासक आणि लढवय्ये चळवळे लोक जाणून आहेत…!