पुणे
पुण्यातील पोर्शे कार अपघात (Pune Accident) प्रकरणात आता अनेक नवी नावे समोर येऊ लागली आहेत. अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबांपाठोपाठ पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. अल्पवयीन आरोपीने ज्या बार आणि पबमध्ये मद्यप्राशन कले. त्या पब, बारचे मालक आणि व्यवस्थापकांवर कारवाई झाली आहे. आता या प्रकरणात काही राजकीय नेत्यांवर आरोप होऊ लागले आहेत. अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे, अजित पवारांचे विश्वासू तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप होऊ लागले आहेत. आता वंचित बहुजन आघाडीने देखील या अपघात प्रकरणावर भाष्य केले असून, यात राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याचे वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) ट्विटमध्ये म्हटले आहे.
पक्षाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या तरी मंत्र्याने फोन केला होता, अशी माहिती आमच्या कानावर आली आहे. विशाल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाची कोणकोणत्या राजकीय पक्षांबरोबर भागीदारी आहे? कोणकोणत्या मंत्र्यांनी त्याच्या कंपनीत पैसे गुंतलेले आहेत? कोणकोणत्या नेत्यांबरोबर त्याचे हितसंबंध आहेत? याची चौकशी व्हायला हवी. ती चौकशी करत असताना अपघाताच्या रात्री त्याने कोणत्या मंत्र्यांना फोन केला होता हे तपासायला हवे.
ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे आणि अशा बऱ्याच अपघातांमध्ये वाहनांचा चालक अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला फारच कमी शिक्षा देण्याचा नियम आता शिथिल करायला हवा. अशा गंभीर अपघातांच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला मोठी शिक्षा व्हायला हवी. पुण्यात जो अपघात झाला ते प्रकरण गंभीर आहे. प्रसारमाध्यमांना या प्रकरणाचं गांभीर्य समजले असून त्यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु, न्यायालयाने या प्रकरणात अद्याप फारसं गांभीर्य दाखवलेलं दिसत नाही. त्यामुळे न्यायालयाला विनंती आहे की हा एक गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे आरोपीविरोधात न्यायालयाने कठोर निर्णय घ्यायला हवेत, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुण्यासह महाराष्ट्रात जितके बार, पब किंवा क्लब आहेत त्यांच्या मालकांवर सरकारने एक अट घालायला हवी. १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना या बार आणि पबमध्ये प्रवेश देऊ नये. एखाद्या बारमालकाने, चालकाने एखाद्या मुलाला त्यांच्या बारमध्ये प्रवेश दिला तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच त्याला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठवायला हवी. त्याच्याकडून दहा लाख रुपयांचा दंड वसूल करायला हवा. त्याचा बार चालवण्याचा परवानाही रद्द करायला हवा, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.