22.3 C
New York

Lok Sabha Election : नाथाभाऊंच्या एन्ट्रीनं निवडणूक फिरली?

Published:

जळगावातील रावेर मतदारसंघ भाजपाचा गड. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचच वर्चस्व राहिलं आहे. (Lok Sabha Election) यंदाही रावेर राखण्यासाठी भाजपनं पहिली चाल टाकली ती खासदार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीने. मतदारसंघातील पक्षाची ताकद आणि पीएम मोदींचा करिश्मा अन् ऐनवेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मिळालेली साथ यावर भाजपने विजयाची गणितं आखली आहेत. त्यांच्या विरोधात उद्योजक श्रीराम पाटील यांना तिकीट दिलंय. पाटील यांच्यासाठी शरद पवारांनी पूर्ण ताकद पणाला लावली. श्रीराम पाटील यांनीही प्रचाराचा रोख मतदारसंघातील प्रश्नांवरच ठेवला होता. रक्षा खडसे यांच्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या या प्रचारावर देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या सभा भारी ठरल्याची चर्चा आहे. आता मतदानही झालंय तेव्हा रावेरकरांनी कुणाला कौल दिला याची उत्सुकता आहे.

Lok Sabha Election  नाथाभाऊंचा प्रचार महायुतीला मोठं बळ

या मतदारसंघात भाजपने उमेदवारांच्या दुसऱ्याच यादीत रक्षा खडसे यांचं नाव नक्की केलं होतं. त्यांना तिकीट मिळालं. त्यानंतर येथील राजकारणही बदलायला सुरूवात झाली. रक्षा खडसेंच्या उमेदवारीवेळी एकनाथ खडसे शरद पवार गटात होते. त्यामुळे शरद पवारांनी त्यांना तातडीने बोलावून घेत रावेरमधू लढणार का अशी विचारणा केली. त्यांच्याबरोबरच कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनाही विचारणा केली. मात्र दोघांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यांच्या नकाराने रावेरातील नणंद विरुद्ध भावजय किंवा सासरे विरुद्ध सून अशी संभाव्य लढत टळली. परंतु, या घडामोडीने एकनाथ खडसे वेगळा निर्णयाच्या तयारीत आहेत ही गोष्ट अधोरेखित झाली होती.

कालांतराने हा अंदाज खरा असल्याचेही दिसून आले. कारण नाथाभाऊंनी थेट दिल्लीतील नेत्यांशी वाटाघाटी करत भाजप प्रवेशाचा बार उडवून दिला. स्वतः या निर्णयाचा खुलासा केला. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर सून रक्षा खडसे यांच्या प्रचारातही सक्रिय झाले. स्थानिक भाजप नेत्यांना हाताशी घेत प्रचाराचं नियोजनही केले. त्यांच्या या भूमिकेनंतर भाजपाचं बरचसं टेन्शन कमी झालं होतं. सध्या एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडला असला तरी त्यांनी मतदारसंघात खरक्षा खडसेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

Lok Sabha Election  भाजप नेत्यांच्या जुळवाजुळवीने बेरीज

दुसरी गोष्टी त्यांच्या बाजूने अशी घडली ती म्हणजे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी मिटवता आली. पाटील यांची नाराजी महायुतीला घातक ठरू शकते याचा अंदाज आल्याने वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. त्याचा इफेक्टही दिसला. आमदार पाटील प्रचारात दिसले. एकनाथ खडसे यांच्याविरोधात कायमच भूमिका घेणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठीही ही निवडणूक महत्वाची होती. त्यामुळे महाजनांनी येथील नाराजांची नाराजी घालवून त्यांची एकत्रित मोट बांधण्यात यश मिळवले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघात सभा घेतली. खासदार नवनीत राणा यांचाही रोड शो झाला. रक्षा खडसे यांनीही मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे प्रचारात त्यांची आघाडी दिसून आली होती. भाजपचे दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांचीही नाराजी दूर झाली. भारतीय जनता पार्टीच्या या प्रचाराचा आणि भाजप नेत्यांनी येथे जुळवलेल्या समीकरणांचा कितपत परिणाम झाला याचं उत्तर चार जूनला मिळेल.

Lok Sabha Election  महाविकास आघाडीचे डाव उलटेच पण..

भाजपाच्या तुलनेत महाविकास आघाडीचे डाव थोडे उलटेच पडले असे म्हणावे लागेल. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नव्हता. निवडणूक आव्हानात्मक करण्यासाठी तुल्यबळ चेहरा हवा होता. मतदारसंघात लेवा समाजाचं प्राबल्य आहे परंतु समाज विखुरलेला आहे. त्यानंतर मराठा समाजाचीही लोकसंख्या मोठी आहे. या गोष्टींचा विचार करत मविआने नवा चेहरा उद्योजक श्रीराम पाटील यांना तिकीट दिलं. नवा चेहरा असल्याने त्यांच्या विरोधात प्रचारासाठी मुद्दा भाजप नेत्यांकडे नव्हता. त्यामुळे पीएम मोदींचा करिश्मा आणि मतदारसंघातील कामं यावर महायुतीचा प्रचार केंद्रीत होता.

अंधारेंची आव्हाड यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट

Lok Sabha Election  शरद पवारांच्या सभा अन् एकाच कुटुंबात दोन पक्ष

दुसरीकडे श्रीराम पाटील यांनी मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला. जळगाव जिल्ह्यात केळी प्रमुख पीक आहे. केळी पीकविमा आणि प्रक्रिया उद्योगांकडे दुर्लक्ष, बेरोजगारी, विकासात्मक कामे, सिंचन योजना, शेतकऱ्यांची नाराजी पाटील यांचा रोख याच समस्यांवर होता. श्रीराम पाटील यांना शरद पवारांची साथ मिळाली. इतकेच नाही तर रक्षा खडसे यांच्या नणंद रोहिणी खडसे यांनी देखील रक्षा खडसे यांच्याविरोधात प्रचार केला. एकनाथ खडसेंनी वेगळी भूमिका घेतली तरी रोहिणी खडसे यांनी मात्र शरद पवार गटात राहणेच पसंत केले. त्यांनीही रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचारात आघाडी घेतली होती. महाविकास आघाडीचं प्रचाराचं तंत्र रक्षा खडसेंना त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Lok Sabha Election  2019 मध्ये काय घडलं होतं ?

सन 2019 मधील निवडणुकीत रक्षा खडसे 3 लाख 35 हजार 882 मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण 6 लाख 55 हजार 386 मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना 3 लाख 19 हजार 504 मते मिळाली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नितीन कांदेलकर यांना 88 हजार 365 मते मिळाली होती.

Lok Sabha Election  रावेरमधील आमदार

रावेर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये रावेर-यावलमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी, मुक्ताईनगर-बोदवड मतदारसंघात शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील, चोपडा मतदारसंघात लता सोनवणे, भुसावळ मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे संजय सावकारे, जामनेरमध्ये भाजपचे गिरीश महाजन तसेच मलकापूर-नांदुरा मतदारसंघात काँग्रेसचे राजेश एकाडे आमदार आहेत. येथील चोपडा, जामनेर या दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता सर्व मतदारसंघात लेवा पाटीदार समाज निर्णायक आहे. त्याखालोखाल मराठा समाजाची ताकद आहे.

Lok Sabha Election  वंचितच्या ब्राह्मणेचं आव्हान

वंचित बहुजन आघाडीने संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या प्रचारासाठी वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतल्या. त्यामुळे संजय ब्राह्मणे यांच्या नावाचीही चांगली चर्चा झाली होती. त्यामुळे मतदारसंघात सुरुवातीला दुरंगी वाटणारी लढत तिरंगी झाली होती. आता या निवडणुकीत रावेरकर जनतेनं कुणाला कौल दिला याचं उत्तर चार जूनलाच मिळणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img