महाड
विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या (Manusmriti) श्लोकांचा वापर करण्यात येणार आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे जाऊन चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचे (Manusmriti) दहन केले. मात्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटोही फाडला. याप्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्यासह 24 जणांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही राज्याचे वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपकडून (BJP) राज्यभरात जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले जात आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या 23 कार्यकर्त्यांवर शासनाच्या आदेशांचे आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय महाड पोलीस प्रशासनाकडून आचारसंहितेचा भंग म्हणून नोटीस बजावली होती. मात्र तरीही जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यावर भा.द.वि. कलम 1860 नुसार सेक्शन 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार सेक्शन 37(1), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार सेक्शन 37(3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सेक्शन 135 या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी चवदार तळ्यावर पाणी पिऊन मनुस्मृतीचा निषेध केला आणि मनुस्मृती दहन आंदोलनात त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली, परंतु या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.