23.1 C
New York

Ulhasnagar : राजू धाटावकर यांची आत्महत्या की प्रशासनाकडून हत्या ?

Published:

उल्हासनगर

उल्हासनगर (Ulhasnagar) महानगरपालिकेच्या सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या राजू धाटावकर (Raju Dhatavkar) यांनी सोमवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. तब्बल सहा महिन्यापासून हॉस्पिटल प्रशासनाने पगार दिला नसल्याने ही आत्महत्या केली असल्याचा आरोप मयत राजू यांच्या परिवाराने केला आहे. त्या विरोधात आज उल्हासनगर महापालिकेच्या (Ulhasnagar Municipal Corporation) बाहेर “कायद्याने वागा” लोकचळवळ संघटनेने मूक निदर्शन आंदोलन केले.

उल्हासनगर महापालिकेचे म्हारळ गाव येथे सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचे फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे, कपील पाटील, रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. कोट्यावधी रुपये खर्च करून हॉस्पिटल तयार असताना देखील हे हॉस्पिटल गेल्या २ वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होते. २ वर्षांपासून रुग्णालय तयार असून त्यातील सामान हे विनावापर तसेच पडले होते. त्यानंतर हे सर्व सामान भंगारात काढून पुन्हा नवीन सामान हे खरेदी करण्यात आले. एकीकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी प्रशासनाकडे पैसे नसताना रुग्णालयातील सामान भंगारात काढून नवीन सामान घेण्यात आले यातून पालिकेचा भोंगळ कारभार हा दिसून येत असल्याचा आरोप कायद्याने वागा संघटनेने केला होता.

हे हॉस्पिटल प्लॅटिनम हॉस्पिटलचे डॉ. संजीत पॉल यांच्याकडे चालवायला देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेहेरबानीने ठाणे महानगरपालिकेचे मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल देखील डॉक्टर संजीत पॉल यांच्या प्लॅटिनम हास्पिटलच्या यादीत या अगोदरच समाविष्ट झाले आहे. अलिकडेच उल्हासनगर महानगरपालिकेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलही डॉ. संजीत पॉल यांच्याकडे देण्यात आले आहे. कोविड काळात देखील एक कोविड हॉस्पिटल डॉक्टर पॉल यांच्याकडेच होते. त्यांच्या विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असताना देखील उल्हासनगर महानगरपालिकेने पुन्हा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे त्यांना चालवण्यासाठी कोणाच्या सांगण्यावरून दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राजू धाटावकर यांच्यासोबत अन्य ३५ कर्मचाऱ्यांना देखील गेल्या ६ महिन्यांपासून पगार दिला जात नव्हता, राजू धाटावकर हे कर्जबाजारी झाले होते, त्यांच्या अंगावर अनेक प्रकारचे कर्ज होते. पगार मिळत नसल्याने त्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य नव्हते, प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील पगार मिळत नसल्याने ते मागील १५ दिवसांपासून घरीच होते, अखेर या सर्व त्रासाला कंटाळून त्यांनी सोमवारी आपली जीवनलीला संपवली.

राजू धाटावकर यांची आत्महत्या नसून महापालिका प्रशासन, राज्य सरकार आणि हॉस्पिटल प्रशासन यांनी मिळून संगनमताने केलेली ही हत्या आहे, तसेच महापालिका आयुक्त अजीज शेख हे आयएएस झाले, मात्र त्यांना माणूस होण्याची गरज आहे असे मत राज असरोंडकर आणि अडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. सोबतच उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर संजीत पॉल यांना हे हॉस्पिटल कंत्राटी पद्धतीवर दिले असताना किमान वेतन कायद्याचे पालन होत नाही तसेच शहरात एम. रामचंदानी हा कंत्राटी पद्धतीवर दिलेल्या कामांमध्ये तो कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्या अंतर्गत वेतन देत नसून तो भाजपचा जिल्हा अध्यक्ष असल्याने आयुक्त अजीज शेख हे त्याच्यावर कारवाई करण्यास घाबरतात असा आरोप राज असरोंडकर यांनी केला आहे. या आंदोलनाच्या प्रसंगी भाजपा आमदार कुमार आयलानी, राजेश वधारिया, दिपू छतलानी, राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img