मुंबई
लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. राज ठाकरे यांनी महायुतीचे (Mahayuti) उमेदवारांकरिता प्रचार सभा देखील घेतल्या होत्या. मनसे आता महायुतीचा घटक पक्ष असल्याचं बोललं जात होतं. मात्र शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदारसंघाकरिता विधान परिषदेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मनसेने कोकण पदवीधर मतदार संघातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आता जाहीर करण्यात आलेले या जागेवर भाजपने (BJP) देखील दावा केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये महायुतीत विरुद्ध मनसे सामना रंगणार असल्याचे चर्चा आहे.
मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी माझी उमेदवारी जाहीर केल्याचं पानसे यांनी पत्रकारांना बोलताना म्हटले. तर, हिंदुत्त्वासाठी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांत बिनशर्त पाठिंबा देऊन आमचा पक्ष चालणार आहे का? असा सवालही मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित करत भाजपने आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा केली आहे. मात्र, मनसेच्या उमेदवारीनंतर आता भाजपनेही विधानपरिषद निवडणुकांसाठीची भूमिका स्पष्ट केली.
विधानपरिषद निवडणुकांसाठी कोकणातील पदवीधर मतदारसंघांची जागा ही आमची हक्काची आहे. निरंजन डावखरेंची ही जागा भाजपाची सिटींग जागा आहे. त्यामुळे, आम्ही विधानपरिषदेची निवडणूक लढणार आहोत. मनसेला आमच्या शुभेच्छा.. असे म्हणत भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मनसेच्या उमेदवारीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, आम्ही बैठकीतून काय तो निर्णय घेऊ असे म्हटले होते. मात्र, आज आशिष शेलार यांनी मनसेला शुभेच्छा दिल्या आहेत.