पुणे
कल्याणीनगर पोर्शे अपघात (Pune Accident) प्रकरणातल अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) दोन डॉक्टर आणि एका शिपायाला अटक करण्यात आली आहे. या तिघांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. डॉ. अजित तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि ससूनमधील शिपाई घटकांबळे या तिघांना ही चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी वेदांतच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांपासून रुग्णालयापर्यंत अशा सगळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरणं काय?
पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघातानं सपूर्ण राज्य हादरलं आहे. मद्यपान करून बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणानं बाईकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुणे हिट अँड रन प्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आता आजोबालाही जेलमध्ये डांबण्यात आलं आहे. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दारुच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपाली सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय. त्याचे वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आजोबा सुरेंद्रला आज पोलीस कोठडीत डांबण्यात आलं. त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांच्या तीन पिढ्या आता जेलमध्ये आहेत.