उमेश पठाडे/ छत्रपती संभाजीनगर
जायकवाडी धरणाचे (Jayakwadi Dam) पाणी झपाट्याने कमी झाल्यामुळे अनेक वर्षांपूर्वीचे मंदिर उघडे झाले आहे. ५० वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेले मंदिर दिसू लागल्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. नगर व संभाजीनगर जिल्ह्यातील धरणाच्या पट्ट्यात खडकुली या ठिकाणचे चक्रधर स्वामी यांचे मंदिरदेखील उघडे पडले आहे.
Jayakwadi Dam : चक्रधर स्वामींचे मंदिर पाहण्यासाठी गर्दी
गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरण बांधले गेले. सन १९६५ मध्ये धरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर २३ मे १९७४ साली धरणात पहिल्यांदाच पाणी साचवण्यास सुरुवात झाली हाेती. यापूर्वी सन २०१८ मध्ये धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्यात आल्यानंतर मंदिरे उघडी पडली होती. त्यानंतर आता सहा वर्षांनंतर पुन्हा उघडी पडली आहेत. आता अनेक वर्षांनंतर जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. काही जुने रस्तेदेखील उघडे पडले असल्याचे अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. चक्रधरस्वामींचे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी रविवारी येथे गर्दी केली होती.
हेही वाचा : लोकदैवत खंडोबाचा गाभारा मोगरा फुलांनी सजला
Jayakwadi Dam : धरणात केवळ 5 टक्के पाणीसाठा
चक्रधर स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली येथून भाविक यायचे. या धरणामुळे प्राचीन हेमाडपंती मंदिरास जलसमाधी मिळाली होती. यात चक्रधर स्वामी, महादेव मंदिरासह मुस्लिम धर्माच्या मशिदीलाही जलसमाधी मिळाली होती. आता धरणाचा पाणीसाठा ५ टक्के झाला असल्याने ही मंदिरे उघडी पडत आहेत. यामुळे ५० वर्षे पाण्यात लाटांशी झुंजदेणारे हे मंदिर उघडे झाले आहे. जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले की धरणाचा पाणीसाठा आणखी कमी झाल्यास आणखी मंदिरे इतर ठिकाणी उघडी पडतील. नागरिकांनी हे बघण्यासाठी आले तरी पाण्यात जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. चक्रधर स्वामी यांचे मंदिरदेखील उघडे पडले आहे.