मराठी नाटक व छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी कासार (Ashwini Kasar). अश्विनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्रीला मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करताना काहीसा विचित्र अनुभव आला. तिने याबाबत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. हा घडलेला प्रकार आपल्या चाहत्यांना सांगत अश्विनीने या संबंधित पोस्टमध्ये मुंबई व रेल्वे पोलिसांना टॅग केलं आहे.
प्रवास करताना नेमकं काय प्रकरण घडलं याबद्दल अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सविस्तरपणे सांगितलं आहे. अश्विनी तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “या बाईंचं नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय समोर ठेऊन बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली. भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्याचाही प्रॉब्लेम होता. मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. माझा मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे.” घडलेल्या प्रकारबदल चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या झाडून हत्त्या!
या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आणि पोस्ट अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. अश्विनीने घडलेल्या प्रकरणाची दखल घेतली जावी असं या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलिसांना सुद्धा टॅग केलं आहे. दरम्यान, सध्या ती ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याआधी अभिनेत्रीने ‘कमला’, ‘कट्टी बट्टी’, ‘सावित्रीजोती’, ‘मोलकरणी बाई – मोठी तिची सावली’ या मालिकांमध्ये झळकली होती.