21 C
New York

Sunil Tatkare : एकच लक्ष विधानसभा क्षेत्र यावर लक्ष केंद्रित – सुनिल तटकरे

Published:

मुंबई

आम्ही राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र हे सुत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे 4 जूनच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतीमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

27 मे रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक गरवारे क्लब हाऊसमध्ये होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मंत्री, आमदार, पक्षाचे लोकसभा उमेदवार, सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

27 मे रोजी आमची आढावा बैठक जरी असली तरी आम्ही संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम देणार आहोत. 10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन असून त्यानुसार मुंबई, दिल्ली याठिकाणी कार्यक्रम करण्याची तयारी व नियोजन होणार्‍या बैठकीत कोअर कमिटीच्या ग्रुपमध्ये चर्चा केली जाणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

या बैठकीला महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या, राजकारणाला कलाटणी देणारा हा प्रवेश होणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक लढलो त्यामध्ये बारामती, रायगड, शिरुर, धाराशीव आणि परभणी जी जागा मित्रपक्ष रासपला दिली. तिथल्याही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि निवडणुकीचा आढावाही घेतला होता. मावळ, पुणे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, व मुंबईतील काही मतदारसंघ, पालघर अशा लोकसभा मतदारसंघात मी दौरे केले आहेत. एकंदरीत राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी महायुतीचे नेते पदाधिकारी यांच्याशी समन्वय करत प्रचाराच्यादृष्टीने बैठका घेण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.

लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करुन महायुतीच्या समन्वय समितीची बैठक लवकर बोलावण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूकीचा आढावा आणि पुढचे नियोजन यासंदर्भात पावले उचलावीत यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिक सक्रियदृष्ट्या दक्ष राहून अधिक ग्रामस्तर ते राज्यपातळीवर काम करण्याचे नियोजन करत आहे. परवा होणार्‍या पक्ष प्रवेशानंतर देशभरात आणि राज्यभरात ताकद अधिक वाढली जाईल असा विश्वास व्यक्त करतानाच त्याचा फार मोठा परिणाम आगामी निवडणुकीत होऊ शकतो असा दावा सुनिल तटकरे यांनी केला.

राज्यात तीव्र पाणी टंचाई आहे. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मराठवाड्यात बैठक घेतली. गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे ज्याठिकाणी पाणीटंचाई तीव्रतेने भासते आहे त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करत किंवा अन्य उपाययोजना करुन जनतेला उपलब्ध होईल यादृष्टीने राज्यसरकारने उपाययोजना कराव्यात. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. माझ्या लोकसभा मतदारसंघातही फटका बसला आहे. मात्र त्या त्यावेळी यंत्रणांच्या माध्यमातून उपाययोजना झाल्या आहेत.आंबा, काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. खरीपाची पिके हातातोंडाशी आली होती त्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये लागू असलेली आचारसंहिता शिथील करावी अशी विनंती राज्यसरकारकडे केली आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

राज्यात ६० टक्के मतदान झाले. एका बाजूला तीव्र उन्हाच्या झळा लागत असताना मतदार मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडला. राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक, राष्ट्रीय प्रश्न, राष्ट्रीय भूमिका मांडण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून मोठया प्रमाणात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेते, राज्यातील महायुतीचे नेते प्रचाराच्या सभा घेत होतो. त्यावेळी या देशाच्या संसदेची निवडणूक आहे. देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे या राष्ट्रीय प्रश्नावर आम्ही बोलत आलो. मात्र विरोधकांकडून अगदी गल्लीबोळातील प्रश्नापासून, वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करण्यात भर ठेवण्यात आला. एकंदरीत निवडणूकीच्या प्रचारात विरोधकांकडून जी भाषा वापरण्यात आली. ती भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला, वैचारिक अधिष्ठानाला त्याला छेद देणारी होती असा आरोपही सुनिल तटकरे यांनी केला.

सगळ्या निवडणूकीत महायुतीला राज्यात निश्चित चांगले यश मिळणार आहे. लढती चुरशीच्या होत्या परंतु अंतिम विजय हा महायुतीचाच होणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण आणि मुंबईतील सभांना उपस्थित राहिलो. या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून निवडणूक प्रक्रियेत वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न झाला. आता प्रत्येकाचे ४ जूनला लागणार्‍या निकालाकडे लक्ष आहे. देशात काय होणार, राज्यात काय होणार… राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण विधानसभा मतदारसंघात काय होणार, पारावर, गल्लीत, चौकात काय होणार याचीच चर्चा आहे. एकंदरीत जनतेचा कौल महायुतीला मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

निवडणुकीत पराजय अधिक स्पष्ट झाल्याचे हे द्योतक आहे. अशापध्दतीचे आरोप केले जातात. ते निराधार असतात परंतु जनाधार घटल्याची ती अप्रत्यक्ष कबुली असते. त्यामुळे यामध्ये यापेक्षा वेगळे असे काही आहे असे मला वाटत नाही. अलीकडे कुठेही बसून व्हिडिओ काढणे आणि प्रसारीत करणे आणि जणू त्या प्रत्यक्ष स्थितीतील आहे अशा पध्दतीचा आभास निर्माण करणे असे आज ज्यांना फारसे काम उरले नाही ते करत आहेत. त्यांनी मागणी जरुर करावी, लोकशाहीत त्यांना तो अधिकार आहे. बीडचे मतदान होऊन पंधरा दिवस उलटले आणि फेरमतदानाची मागणी आता केली जात आहे. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूका होत असताना फेरमतदानाची मागणी किती कालावधीत केली जाते तर त्या क्षणाला, संध्याकाळी, दुसर्‍या दिवशी होऊ शकते. पण पंधरा – वीस दिवसाने मागणी केली जाते याचा अर्थ निवडणूकीचा निकाल काय लागणार आहे हे स्पष्ट झाल्याच्यानंतर यापध्दतीची मागणी केली जाते हे हास्यास्पद आहे असे जोरदार प्रत्युत्तर सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना विरोधकांना दिले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ४८ – ० सांगायला हवे होते. त्यांचा इतका गाढा अभ्यास आणि महाराष्ट्रात त्यांची कर्तबगारी चार वर्षे महाराष्ट्राने पाहिली आहे त्यामुळे चंद्र – सुर्य असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाण राज्यात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत अशी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची अपेक्षा आहे असा जोरदार टोला सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img