३१ मे रोजी केरळमध्ये मोसमी पाऊस (Monsoon) दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे. आता केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. तसेच दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
आयएमडीने पुढील दोन दिवस केरळमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. दक्षिण केरळमध्ये चक्रीवादळाच्या प्रभावाखाली अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याची माहिती आहे. केरळच्या किनारपट्टीपासून दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्या ने आयएमडीने पुढील दोन दिवस केरळमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. बुधवारी रात्रीपासून केरळच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. केरळमध्ये बरसणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मान्सूनला अजून एक आठवडा बाकी असूनही अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
वेंगुर्ला बंदरात बोट उलटली; दोघांचा मृत्यू
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार एर्नाकुलम आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून अति मुसळधार पाऊस पडत आहे. तर केरळच्या आठ इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर उत्तरेकडे दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत उष्णतेचा सामना करावा लगत आहे. दक्षिण भारतात मान्सूनपूर्व पाऊस सक्रीय झाला आहे. २३ मे रोजीच्या आयएमडी डेटावरून असे दिसून आले की, गेल्या काही दिवसांतील अति मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात सामान्य पावसाचे प्रमाण वाढले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केरळमध्ये पाऊस सुरू असल्याने अचानक ढगफुटी किंवा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच काही ठिकाणी सखल भागात भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच केरळ किनारपट्टीवरील मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मात्र महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे
नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देशात बरसतो. मान्सून केरळमध्ये ३१ मे पर्यंत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर १० ते ११ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनच्या आधी सध्या शेती मशागतीला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.