26.2 C
New York

Amravati Lok Sabha : अमरावतीत कोण उधळणार विजयाचा गुलाल?

Published:

अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघाची निवडणूक 26 एप्रिल रोजी पार पडली. 11 लाख 69 हजार 97 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर आता मतदारसंघात कोणाचे वर्चस्व राहणार आहे? बळवंत वानखडे (Balwant Wankhade) हे नवनीत राणांचा (Navneet Rana) संसदेत जाण्याचा मार्ग रोखणार का? अमरावतीचा निकाल काय लागणार? याचे आडाखे सर्वसामान्यांसह राजकीय विश्लेषक बांधत आहेत. दरम्यान, अमरावतीत विजयाचा गुलाल कोण उधळतो, हेच ४ जूनलाच स्पष्ट होईल.

Amravati Lok Sabha मतदारसंघाची पार्श्वभूमी

अमरावती मतदारसंघ हा काँग्रेसचा जुना बालेकिल्ला होता. मात्र, रिपब्लिकन नेते राजाराम सुकाजी गवई यांचाही मध्यंतरीच्या काळात मतदारसंघात चागंलेच वर्चस्व होतं. गवई आणि काँग्रेसमध्ये युती असायची. आणि अनेक वेळा काँग्रेसने गवई यांना पाठिंबा देऊन निवडून आणले. 1999 पासून येथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येत होते. 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेचे अनंत गुढे यांनी निवडणूक जिंकली होती. 2009 मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्यानं शिवसेनेचे आनंद अडसूळ येथून निवडणूक लढले होते. अडसूळ अमरावतीतून दोनदा खासदार राहिले. पण 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता.दरम्यान, अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांकडून प्रचंड विरोध होता. पण तरीही भाजपकडून नवनीत राणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यंदा 37 उमेदवार रिंगणात होते.

Amravati Lok Sabha विद्यमान आमदारांविरोधात रोष

बडनेरा, अमरावती, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट आणि दर्यापूर या सहाही विधानसभा मतदारसंघ मिळून सरासरी 63.67 टक्के मतदान झाले. बडनेऱ्यात 55.78 टक्के, अमरावती 57.51 टक्के, तिवसा 64.14 टक्के, दर्यापूर 66.88 टक्के, मेळघाट 79.55 टक्के आणि अचलपूरमध्ये 68.84 टक्के मतदान झालं. गत निवडणुकीच्या तुलनेत अमरावतीत मतदानाचा टक्का वाढला आहे. हा वाढलेला टक्का मतदारसंघात परिवर्तन घडवणार अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. भाजप उमेदवारांविषयी मतदारांच्या मनात रोष असल्यानं मतदानाचा टक्का वाढल्याचं जाणकार सांगतात.

Amravati Lok Sabha अमरावतीत कॉंग्रेसची ताकद जास्त

अमरावती लोकसभा क्षेत्रातील सहापैकी बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा आमदार आहेत. हा मतदारसंघ सोडला तर अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके, तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यापूरमधून काँग्रेसचे बळवंत वानखडे, मेळघाटमधून प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल आणि अचलपूरमधून बच्चू कडू आमदार आहेत. जे नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत.

‘या’ मतदारसंघांत INDIA-NDA ची वाढणार ‘धाकधूक’

Amravati Lok Sabha भाजप नेत्यांशी असलेलं वैर राणांना जड जाणार

भाजप नेते आणि माजी मंत्री प्रवीण पोटे अमरावतीचे पालकमंत्री असताना रवी राणा आणि प्रवीण पोटे यांच्यात खटके उडाले होते. तेव्हा रवी राणांनी प्रवीण पोटेंना बालकमंत्री असं संबोधलं होतं. त्यामुळं पोटेंनी नवनीत राणांच्या उमेदवारीलाही विरोध केला होता. तसंच श्रीकांत भारतीय यांचे बंधू आणि भाजप नेते तुषार भारतीय यांचाही राणांच्या उमदेवारीला विरोध केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुषार भारतीय आणि रवी राणा यांच्यात वाद झाला होता. हे जुने वाद आणि वैर पाहता हे भाजप नेते नवनीत राणांना मदत करण्याची सुतराम शक्यता नाही, असं स्थानिक विश्लेषक सांगतात. याचा फटका नवनीत राणांना बसू शकतो. महायुतीच्या आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांनीही राणांना विरोध केल्यानं नवनीत राणा पराभवाच्या छायेत आहेत, असं बोलल्या जातं.

Amravati Lok Sabha काँग्रेस-राष्ट्रवादीची व्होट बँक वानखडेंसोबत…

कित्येक वर्षांनंतर या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. ही जागा यापूर्वी शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढण्याचा प्रश्नच नव्हता. काँग्रेसच्या बाबतीतही असेच घडले. आता काँग्रेस-राष्ट्रवादीची व्होट बँक काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यासोबत आहे. वानखडेंचं उदारमतवादी राजकारण ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांच्या संयमी आणि उदारमतवादी राजकारणामुळं दलित आणि मुस्लिम मतदारही वानखडे यांच्या पाठीशी आहे, असं राजकीय जाणकार सांगतात.

Amravati Lok Sabha निवडणुकीच्या आधी कडूंच्या हातात ‘आयतं कोलीत’

निवडणुकीच्या दोन दिवस आधी अमरातवीतील सायन्‍सकोर मैदानावरून भाजप आणि प्रहार यांच्‍यात मोठा संघर्ष झाला होता. सायन्‍सकोर मैदान प्रहारच्‍या सभेसाठी आरक्षित केलेले असतांना सुरक्षेचे कारण देऊन ते प्रहारला नाकारल्या गेला. त्यामुळं बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. प्रशानसनाची भूमिका न्यायाची नाही, असं त्यांनी घसा ओरडून सांगितलं. तरीही बच्‍चू कडूंना माघार घ्‍यावी लागली. मात्र, त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले होते. भाजपविरोधी प्रचाराची आयती संधी त्‍यांना मिळाली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातून सहानुभूती मिळवण्‍याचा त्‍यांनी चांगलाच प्रतत्न केला.

Amravati Lok Sabha वंचितमधील फूट कॉंग्रेसच्या पथ्यावरच पडणार

सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीने अमरावतीत आपला उमेदवार उभा केला होता. यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करताच वंचित आणि एमआयएमने त्यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, अंजनगाव सुर्जी तालुकाध्यक्ष सुनील रक्षक, महिला आघाडी शहराध्यक्षा भारती गुडधे, महिला आघाडी सचिव रेहना खान, सरचिटणीस मेराज खान यांनी बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळं त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीत पडलेली उभी फूड ही कॉंग्रेसच्या पथ्यावरच पडणार असं राजकीय जाणकार सांगतात.

Amravati Lok Sabha बूब यांना मिळालेली मते कोणाला धक्का देणार?

ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ व निष्ठावंत राहिलेल्या दिनेश बूब यांना बच्चू कडू यांनी उमेदवारी दिली. दिनेश बूब यांच्या उमेदवारीचा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींवरही परिणाम होणार, असं चित्र आहे. कारण, अमरावतीमध्ये मेळघाट आणि अचलपूर या दोन मतदारसंघात प्रहारचे राजकुमार पटेल आणि बच्चू कडू हे आमदार आहेत. याचा फायदा बुब यांना मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळं बुब यांना मिळालेली मते कोणाला धक्का देतील यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.

Amravati Lok Sabha आंबेडकर कोणाची मते खाणार?

अमरावती लोकसभा मतदारसंघात दलित, मुस्लिम, आदिवासी, कुणबी अशा सर्व समाजातील लोक मतदार आहेत. येथील दलितांची संख्या आणि रा सु गवईंची पुण्याई लक्षात घेता आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर हेही निवडणुकीच्या रिंगणात होते. इथं खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. मात्र आनंदराज आंबेडकर हे कोणाची मते खातात, त्यावर इथला खासदार ठरणार असं राजकीय विश्लेषक सांगतात.

Amravati Lok Sabha दलित आणि मुस्लिमांचा निसटलेला जनाधार राणांसाठी अडसर

अमरावतीमध्ये गेल्या काही वर्षांत प्रखर हिंदुत्वाचे राजकारण बळावले आहे. नवनीत राणा यांनी त्यावर स्वार होत जनाधार वाढवण्याचा चांगला प्रयत्न केला. चांगला जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. शिवााय, बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना पूर्णत्वास जाणं, विमानतळाच्या पूर्णत्वाच्या कामाला आलेला वेग, पीएम मित्र टेक्सटाईल पार्कच्या उभारणीची घोषणा ही बाबी राणा यांच्यासाठी अनुकूल असल्या तरी राजकीय नेत्यांशी घेतलेलं वैमनस्य, पक्षांतर्गत नाराजी, दलित आणि आणि मुस्लिमांचा निसटलेला जनाधार ह्या बाबी राणांच्या विजयात मोठ्या अडसर आहेत.

Amravati Lok Sabha मतदारसंघातील जातीय समीकरणे

या मतदारसंघात कुणबी-मराठा बहुसंख्य आहेत. त्याखालोखाल माळी, तेली या जातसमूहांची मतदारसंख्या मोठी आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात हिंदूंचे प्रमाण हे 52.73 टक्के, मुस्लिम 13.31 टक्के, बौद्ध 17.43 टक्के आणि इतर 16.43 टक्के आहेत. यावेळी कुणबी मतांचे विभाजपन कशा पद्धतीने होते? देशमुख, मराठा, कुणबी, तेली, माळी, मुस्लिम आणि हिंदी भाषिक मतदार नेमकी कुणाला पसंती देतात, यावरही उमेदवारांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.

Amravati Lok Sabha मेळघाटची मते निर्णायक

सर्वाधिक 79.55 टक्के मतदान मेळघाटात झाले. जल, जमीन, जंगल या तीन मुद्द्यांवर या मतदारसंघात आदिवासी युवकांनी मंथन केले. त्याचा इम्पॅक्ट मतदानावर झाला. त्यामुळे ही मते ज्याच्या बाजूने पडतील त्याला फायदा नक्कीच होणार आहे, असं राजकीय जाणकार सांगतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img